भारतीय पारंपरिक उपचारांचे जागतिक प्रमाणीकरण महत्वपूर्ण

  • By admin
  • August 19, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

कुलगुरू माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन

नाशिक ः भारतीय पारंपरिक उपचारांचे जागतिक प्रमाणीकरण महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी ’इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस’ च्या समारोपाच्या वेळी केले. 

आरोग्य विज्ञान विद्यापीठ, जागतिक आरोग्य संघटना व सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदीक सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने  ’इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  कुलगुरू माधुरी कानिटकर यांच्या समवेत प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, दक्षिण-पूर्व जागतिक आरोग्य संघटनेचे तांत्रिक अधिकारी डॉ पवनकुमार गोदतवार, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखाधिकारी बोधीकिरण सोनकांबळे आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकासाठी सारख्या अद्ययावत वर्गीकरण पद्धतीची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे जागतिक स्तरावर हेल्थ डेटाची अचूकता राखण्यास मदत होते आणि आरोग्यविषयक धोरणे अधिक प्रभावीपणे आखता येतात. विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना या नव्या मानकांबद्दल प्रशिक्षण देणं ही काळाची गरज आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, भारतीय उपचार पद्धती आणि औषधे जगभरात लोकप्रिय ठरत आहे. संपूर्ण जगाला आयुर्वेदाचे काम समजायला लागले आहेत. मात्र अजुनही रोग, व्याधी आणि औषधांचे प्रमाणिकरण होणे आवश्यक आहे. यासर्वांची एकत्रित माहिती गोळा करुन त्यांचे संघटन करण्याची गरज आहे. सदर माहिती इंटरनेटद्वारे जगभरात प्रसिद्ध होईल जेणेकरुन विकसित भारताच्या संकल्पनेला एक नवी दिशा मिळेल. यासाठी आरोग्य क्षेत्रातील विविध पॅथीचे डॉक्टर, शिक्षक यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. डिजिटल साधनांचा वापर करुन माहितीचे एकत्रिकरण करणे आवश्यक आहे. आयसीडी ११ हे डिजिटल मोड्युल आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घडवेल असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, आयसीडी ११ ही केवळ एक तांत्रिक बाब नसून, ती सार्वजनिक आरोग्याची दिशा ठरवणारी एक महत्वाची प्रणाली आहे. रोगांचे अचूक वर्गीकरण झाल्यास, उपचारांच्या पध्दती सुधारण्यास आणि साथरोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. या कार्यशाळेमुळे आपल्या विद्यापीठातील संशोधक आणि विद्यार्थी यांना नवीन ज्ञान मिळेल, ज्यामुळे ते भविष्यात आरोग्य सेवेमध्ये महत्वपूर्ण योगदान देतील. या दोन दिवसांत सहभागी विद्यार्थ्यांकडून मिळालेले उपाय आपल्या आरोग्य प्रणालीला नवी दिशा देतील.

दक्षिण-पूर्व जागतिक आरोग्य संघटनेचे तांत्रिक अधिकारी डॉ पवनकुमार गोदतवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मेडिकल रेकॉर्ड ऑण्ड कोडिंग सिस्टीम, इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस रुल्स ऑण्ड गाईडलाईन, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड, आयुष हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम आदी विषायांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

विद्यापीठात आयोजित ’इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस’ दोन दिवसीय कार्यशाळेत आरोग्य क्षेत्रातील शिक्षक, डॉक्टर व अभ्यागतांनी मोठया संख्येने सहभाग घेतला होता. उद्घाटन समारंभात सहयोगी प्राध्यापक डॉ श्वेता तेलंग यांनी सूत्रसंचालन केले. आयुष विभागाच्या प्राध्यापक डॉ गितांजली कार्ले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाकरीता सानिया भालेराव, डॉ प्रदीप आवळे, डॉ वैभव आहेर, डॉ महेंद्र पटाईत, डॉ गौरांग बक्षी व विद्यापीठाच्या शैक्षणिक शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *