
पुणे जिल्हास्तरीय सिलंबम स्पर्धेत ५५० खेळाडूंचा सहभाग
पुणे : आठव्या पुणे जिल्हास्तरीय सिलंबम स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील २६ प्रशिक्षण केंद्रातील ५५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल, ड्रॅगन मल्टी स्पोर्ट्स फाऊंडेशन या संघांनी विजेतेपद पटकावले.

निवारा हॉल नवीपेठ पुणे येथे लाठी-काठी, तलवारबाजी, भाला चालवणे, दांडपट्टा (सुरुल), मडु इत्यादी क्रीडा प्रकारांमध्ये आठवी पुणे जिल्हास्तरीय सिलंबम स्पर्धा उत्साहात पार पाडली. या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुले व मुली डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल टिळक रोड संघाने प्रथम क्रमांक पटकावला. नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशन दिघी संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आणि युनिक इंटरनॅशनल स्कूल लोहगाव संघाने तृतीय क्रमांक पटकावला, पंडितराव आगासे इंग्लिश मीडियम स्कूल लॉ कॉलेज रोड संघाने चौथा क्रमांक पटकावला.
१८ वर्षाखालील वयोगटात ड्रॅगन मल्टी स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने प्रथम क्रमांक पटकावला, लोहगाव सिलंबम संघाने द्वितीय क्रमांक पटकावला, सोमवार पेठ मार्शल आर्ट संघाने तृतीय क्रमांक पटकावला, मृत्युंजय मर्दानी खेळ आखाडा चिखली संघाने चौथा क्रमांक पटकावला.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश कंठाळे, स्पर्धा आयोजन कमिटी अध्यक्ष संतोष चोरमले, महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन जनरल सेक्रेटरी कुंडलिक कचाले उपस्थित होते.