
लंडन ः महिलांची द हंड्रेड लीग सध्या इंग्लंडमध्ये होत आहे. महिला द हंड्रेड लीग २०२५ मध्ये, सदर्न ब्रेव्ह महिला संघ आणि ओव्हल इनव्हिन्सिबल्स महिला संघ यांच्यात एक सामना झाला, त्यामध्ये सदर्न ब्रेव्ह संघाने ८९ धावांनी सामना जिंकला. सामन्यात ब्रेव्ह संघाने प्रथम फलंदाजी करत १६१ धावा केल्या. त्यानंतर, ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघ फक्त ७२ धावांवर बाद झाला.
सदर्न ब्रेव्ह संघाने ८९ धावांनी सामना जिंकून इतिहास रचला आहे. महिला द हंड्रेड लीगमध्ये धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०२५ मध्येच लंडन स्पिरिट संघाने बर्मिंगहॅम फिनिक्स संघाविरुद्ध ८८ धावांनी सामना जिंकला होता. पण आता महिला द हंड्रेड लीगमध्ये, सदर्न ब्रेव्ह महिला संघाने हा विक्रम मागे टाकला आहे.
सदर्न ब्रेव्ह संघाकडून माया बोचियर (३४ धावा) आणि डॅनी वायट-हॉज (२६ धावा) यांनी जोरदार फलंदाजी केली आणि या दोन्ही खेळाडूंनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या लॉरा वोल्वार्ड्टनेही ३६ धावा केल्या. शेवटी फ्रेया कॅम्पने ११ चेंडूत २४ धावा केल्या, त्यात एक चौकार आणि दोन षटकार मारले. या खेळाडूंमुळेच सदर्न ब्रेव्ह संघाने निर्धारित १०० चेंडूत १६१ धावा केल्या.
त्यानंतर, ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघाकडून कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. अमांडा-जेड वेलिंग्टनने संघाकडून सर्वाधिक १८ धावा केल्या. संघाच्या खराब फलंदाजीचा अंदाज यावरून लावता येतो की संघासाठी फक्त चार खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकले. यामुळे संपूर्ण संघ फक्त ७२ धावा करू शकला. दुसरीकडे, सदर्न ब्रेव्ह संघाकडून मॅडी व्हिलियर्स हिने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. सोफी डेव्हाईन आणि लॉरा वेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.