
पुणे ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या हडपसर येथील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन कक्षामार्फत बी फार्मसी, बी एस्सी, बी ए व बी कॉम या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते.
ही भरती मोहिम एजिओ फार्मास्युटिकल्स लिमिटेड या औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनीसह तसेच युरेका आऊटसोर्सिंग सोल्युशन्स, जस्ट डायल आणि कॅलिबेहर-एसबीआय प्रो या इतर प्रतिष्ठित व नामांकित कंपन्यांच्या सहकार्याने पार पडली. निवड प्रक्रियेला प्री-प्लेसमेंट टॉकने सुरुवात झाली, त्यानंतर तांत्रिक मुलाखती घेण्यात आल्या. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी या भरतीत उत्साहाने सहभाग नोंदवून आपले तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्य व व्यावसायिक तयारी प्रभावीपणे सादर केली.
कठोर निवड प्रक्रियेनंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या फार्मसी कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांची प्रोडक्शन, गुणवत्ता नियंत्रण, गुणवत्ता हमी व मार्केटिंग या विभागांत आकर्षक पॅकेजेसह आणि करिअर प्रगतीची संधी असलेल्या पदांसाठी निवड करण्यात आली. पारस घुले, रोहन तारु, अर्पिता वने, मृणाल गाडे आणि यासीर शेख या मुलांची निवड झाली.
संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर वाय पाटील, प्लेसमेंट ऑफिसर डॉ अभिषेक पवार तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच, संस्थेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची दखल घेऊन नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व कंपन्यांचे आभार मानले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातील आणखी एक महत्वाचा टप्पा ठरला.