जळगाव शालेय बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

  • By admin
  • August 20, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

जळगाव ः जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवत आपले वर्चस्व अधोरेखित केले.

अनुभूती निवासी स्कूलच्या बॅडमिंटन हॉल येथे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जळगाव तालुका क्रीडा प्रमुख प्रशांत कोल्हे व अन्य शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेमध्ये जळगाव तालुक्यातील २८ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या मान्यतेने ही स्पर्धा जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीद्वारे आयोजित केले होती.

या स्पर्धेच्या प्रथम स्थान, द्वितीय स्थान व तृतीय स्थान प्राप्त झालेल्या संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड व अनुभूती स्कूलद्वारे प्रायोजित सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक देण्यात आले. अंतिम सामन्यांपर्यंत चुरसीच्या झालेल्या या स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलला १४ वर्षांखालील मुलांच्या संघात, १९ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या संघाने प्रथम स्थान प्राप्त करीत सुवर्ण पदक मिळविले तर १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने द्वितीय स्थान मिळविले. त्यामुळे त्यांना रौप्य पदकाने गौरविण्यात आले. मुलींच्या १७ वर्षांखालील संघाने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक प्राप्त केले. सर्व विजयी खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, मंजुषा भिडे, कुलदीप पांडे, मनीषा देशमुख, राहुल, किशोर सिंह, दीपिका ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अनुभूती स्कूलच्या यशस्वी खेळाडूंचे कौतूक अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीष दास, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी केले. विद्यार्थ्यांना बॅडमिंटन प्रशिक्षक किशोर सिंह व दीपिका ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. पंच म्हणून जाजिब शेख, कोनिका पाटील, दिव्यांश बैद, पूनम ठाकूर, सोमाणी यांनी काम पाहिले. स्पर्धेचया यशस्वीतेसाठी समीर शेख, विकास बारी, शुभम पाटील यांच्यासह अनुभूती स्कूल व जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *