
सासवड ः राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने संजीवनी एज्युकेशनल, कल्चरल अँड स्पोर्ट्स रिसर्च फाउंडेशन पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्य क्रीडा रत्न पुरस्कार शरीरसौष्ठव खेळाडू संकेत संजय काळे याला जाहीर झाला आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप व सचिव अर्चना जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या पुरस्काराची घोषणा केली आहे. मानपत्र, शाल, भारतीय संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा पुरस्काराचे सलग दुसरे वर्ष आहे.
पुरस्कार प्राप्त शरीरसौष्ठवपटू संकेत काळे याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचा ‘आंतरमहाविद्यालयीन श्री’ हा किताब सलग तीन वेळा प्राप्त केला आहे. तसेच ‘ज्युनिअर महाराष्ट्र श्री’, ‘सीनियर महाराष्ट्र श्री’, ‘ज्युनिअर मिस्टर इंडिया’ हे किताब प्रत्येकी एकदा पटकाविले आहेत. जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत असताना त्याने मिस्टर युनिव्हर्स या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. तसेच त्याने सलग दोन वेळा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेच्या विजेतेपदाचा किताब मिळविला आहे. शरीरसौष्ठव पटू संकेत काळे याने आतापर्यंत ४० पेक्षा जास्त बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये सहभाग व पारितोषिके मिळवली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या दुष्काळग्रस्त तालुक्यातील डोंगरगावचा सुपुत्र संकेत काळे पुण्यात गेली आठ वर्षे सराव करत आहे. सध्या तो पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय, सासवड येथे एमए राज्यशास्त्र प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने २९ ऑगस्ट रोजी कोंढवा बुद्रुक, पुणे येथे पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.