
मुंबई ः आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी ५ रौप्य पदक पटकावत स्पर्धा गाजवली. या शानदार कामगिरीमुळे त्यांची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिंदाल विद्या मंदिर विद्यानगर, कर्नाटक सीबीएसई साउथ झोन-२ योगासन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंदाल विद्यामंदिर विद्यानगर, कर्नाटक येथे नुकतीच झाली. यात पाच राज्यातील ७२ केंद्रीय माध्यमिक शाळेतील ६०० विद्यार्थी सहभागी झालेले होते.
सीबीएसई झोनल योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल शहापूरच्या (जिल्हा ठाणे) वयोगट १४ वर्षांमध्ये चैतन्या दिलीप भोईर, कोमल कांताराम रिकामा, धनश्री दिलीप शिंदे, वंदना रामा आघान व शालिनी गणपत हांडवा असा पाचही मुलींचा संघ ट्रॅडिशनल योगासन ग्रुप, आर्टिस्टिक व रीदमिक क्रीडा प्रकारात सहभागी झाला होता. या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट योगासने करून स्पर्धेचा गुणांक गाठत फायनल राऊंड पर्यंत मजल घेतली. तसेच वयोगट १७ वर्ष मुली वयोगटात ट्रॅडिशनल योगासन क्रीडा प्रकारात चेतना सोमनाथ साबळे, हर्षदा बाळू घोरपडे, शालिनी गणेश म्हसे, सलोनी गणेश म्हसे, समीक्षा सुरेश मिरका या पाचही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट योगासने करून ३० संघांवर बाजी मारत पाच रौप्य पदक पटकाविले.
या कामगिरीमुळे पाचही विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येत्या ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत सहारनपूर, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीबीएसई योगासन स्पर्धेत ते आपले कौशल्य दाखवतील. या सर्व खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख व योगाशिक्षक पुरुषोत्तम पाणबुडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.