
नाशिक ः माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य व नाशिक जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे आयोजित “सर विचार सभा” उत्साहात पार पडली. या विशेष सभेत निफाड तालुक्यातील क्रीडा शिक्षक विलास गायकवाड यांची नाशिक जिल्हा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेश सारणीकर, राज्य सचिव विनोद गायकवाड व उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राहुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार निवड प्रक्रिया राबवण्यात आली. सर्व सदस्यांनी एकमुखाने विलास गायकवाड यांच्या नावास मंजुरी दिली.
विलास गायकवाड हे शिक्षण व क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, माहिती अधिकाराच्या बाबतीत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
विलास गायकवाड यांच्या निवडीनंतर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर, सचिव विनोद गायकवाड, विभागीय अध्यक्ष राहुल कुलकर्णी, जिल्हा सचिव निशांत कापडिया, सहसचिव, तसेच समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आपण माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्यावर मी खरे उतरून माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती नाशिक जिल्ह्यात तसेच माझ्या कार्यक्षेत्रामधील सर्व तालुक्यात व गावागावांत संस्थेच्या माध्यमातून काम करून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. आपण जी जबाबदारी सोपवली आहे तिचा स्वीकार करून मी माझ्या कामातून संस्थेचे नाव कसे मोठे करता येईल यासाठी मी सदैव तत्पर राहून काम करेल अशी प्रतिक्रिया जिल्हा अध्यक्ष विलास गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.