
सांगली संघ उपविजेता, नाशिक संघ तृतीय
मुंबई ः ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनने १५ व्या पिंच्याक सिलॅट राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन क्राईस्ट अकॅडमी स्कूल कोपरखैरणे, नवी मुंबई येथे केले होते. या स्पर्धेमध्ये २६ जिल्ह्यातील ४८५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
ही स्पर्धा प्री-टेन, सब ज्युनिअर, ज्युनिअर वयोगटातील मुला-मुलींसाठी होती. या स्पर्धेचे उद्घाटन टीएनटी इन्फ्राचे चेअरमन शिवाजीराव थोरवे, प्राचार्य फादर जिंटो, राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र प्रताप सिंग, संजीव पांडे, हरिदास थोरवे, मिथुन जोशी, डी एन मिश्रा, सुरेखा येवले, सुरेखा पाटील, मुकेश सोनवणे, प्रकाश पार्टे, पौर्णिमा तेली आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभास औदुंबर पाटील, किशोर येवले, संजय जाधव, तृप्ती बनसोडे, धनंजय जगताप, संकेत धामंडे, अरविंद शिर्के, विलास कांबळे, प्रवीण कुडले, सागर शेलार, योगेश पानपाटील, नागेश बनसोडे दत्ता भवारी, ओंकार मोहिते, आश्विनी राऊत, पल्लवी म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना मेडल प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये ४६ सुवर्ण, २० रौप्य आणि १२ कांस्य अशी सर्वाधिक पदके मिळवून नवी मुंबई संघाने विजेतेपद पटकावले. तसेच ४३ सुवर्ण व १ रौप्य अशी ४४ पदके मिळवून सांगली जिल्ह्याचा संघ उपविजेता ठरला. १३ सुवर्ण, १३ रौप्य आणि १३ कांस्य पदके मिळवून तिसऱ्या स्थानी नाशिक जिल्ह्याचा संघ राहिला. चौथ्या स्थानी ८ सुवर्ण, ८ रौप्य, ८ कांस्य पदके मिळवून अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ राहिला.
या स्पर्धेतील विजयी खेळाडूंची निवड २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत हुबळी, कर्नाटक येथे होणाऱ्या १३ व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेसाठी करण्यात आली आहे .सर्व स्तरातून विजयी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे.