विभागीय, राज्य पातळीवर स्क्वॅशची सांघिक स्पर्धा होणार 

  • By admin
  • August 20, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांचे राज्यातील सर्व क्रीडा कार्यालयांना पत्र 

पुणे ः शालेय क्रीडा स्पर्धेच्या हंगामाला सुरुवात झाली असून आंतर शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धा जिल्हास्तरावर फक्त वैयक्तिक स्वरुपात होणार आहे. विभागीय व राज्य पातळीवर सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्वरुपात स्क्वॅश स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे यांना एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा उपसंचालक यांना पत्राद्वारे स्क्वॅश खेळाच्या वैयक्तिक व सांघिक प्रकारच्या आयोजनाविषयी माहिती दिली आहे.

महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे यांनी स्क्वॅश खेळाच्या आंतरराष्ट्रीय एकविध खेळ संघटनेच्या नियमानुसार, विविध स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोदन हे वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही प्रकारात घेऊन खेळाडूंचे नुकसान टाळण्याबाबत विनंती केली आहे.

भारतीय शालेय खेळ महासंघ याद्वारे स्क्वॅश क्रीडा प्रकारांच्या शालेय राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन हे वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही प्रकारांत केले जाते. या दोन्ही प्रकारांच्या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांना स्वतंत्रपणे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाची पदके तसेच प्राविण्य-सहभाग प्रमाणपत्रे वितरीत केली जातात. तथापी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय स्क्वॅश रॅकेट स्पर्धा तसेच निवड चाचणीचे आयोजनकरुन राज्याचा संघ निश्चित केला जातो. या प्रक्रियेत स्क्वॅश क्रीडा प्रकाराच्या फक्त वैयक्तिक स्पर्धा आयोजित केल्या जातात व राष्ट्रीय स्पर्धेसाठी वैयक्तिक व सांघिक प्रकारांसाठी संघ निवडले जातात ही वस्तुस्थिती आहे. 

जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील सहभागी तसेच प्राविण्यप्राप्त खेळाडूंना, क्रीडा गुण सवलत, शासकीय तसेच निमशासकीय नोकऱयांमध्ये पाच टक्के खेळाडू आरक्षण, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शिष्यवृत्ती यासारख्या इतर योजनांचा पात्रतेनुसार लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येते. 

राज्यातील स्क्वॅश खेळातील खेळाडूंच्या क्रीडा भवितव्याचा विचार करता त्यांना शालेय स्पर्धेद्वारे प्रोत्साहन मिळावे व पात्रतेनुसार शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सन २०२५-२६ पासून जिल्हास्तरावर वैयक्तिक तसेच विभागीय व राज्यस्तरावर वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही प्रकारांत स्पर्धेचे आयोजन स्क्वॅश खेळाच्या आंतरराष्ट्रीय एकविध संघटनेच्या नियमानुसार करून त्यानुसार प्राविण्य प्रमाणपत्र व पदके वितरीत करावीत असे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

कोट
राज्य स्क्वॅश रॅकेट संघटनेने सतत पाठपुरावा करून हे यश मिळवले आहे आणि क्रीडा आयुक्त शीतल उगले, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, क्रीडा उपसंचालक उदय जोशी आणि क्रीडा विभागातील अरुण पाटील यांच्या मौल्यवान सहकार्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. पूर्वी, राज्यस्तरीय शालेय खेळांमध्ये सांघिक कार्यक्रमांचा समावेश नव्हता. परंतु, एसजीएफआय राष्ट्रीय स्तरावर, वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही प्रकारांमध्ये स्पर्धा होत होत्या. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान होत होते. आम्ही हे क्रीडा विभागाच्या निदर्शनास आणून दिले आणि क्रीडा विभागाने अतिशय तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन भावी पिढीचे नुकसान टाळले आहे. 

  • डॉ प्रदीप खांड्रे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्क्वॅश संघटना. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *