
मुंबईच्या एफआरएसटी फाउंडेशनचा पुढाकार
छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी महाविद्यालयातील दृष्टीहीन विद्यार्थ्यांना एफआर एसटी फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने उच्च दृश्य मानता रिफ्लेक्टिव्ह जॅकेट आणि रेनकोटचे वितरण करण्यात आले.
सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. यापूर्वीही ९० विद्यार्थ्यांना जॅकेट आणि रेनकोटच्या वितरण करण्यात आले होते. अंध आणि कमी दृष्टी असलेल्या लोकांसाठी एफआरएसटी फाउंडेशन यांनी संशोधन करून उच्चदृश्य मानता परावर्तक जॅकेट आणि रेनकोटची निर्मिती केली आहे. अंध विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी जॅकेट आणि रेनकोटची निर्मिती करण्यात आल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
एफआरएसटी फाउंडेशन मुंबईचे संस्थापक फतेह रंधवा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाज यांच्या मार्गदर्शनांतर्गत फाउंडेशन कार्य करत आहे. देशभरामध्ये साडेतीन कोटी अंध लोक आहेत आणि त्यांचे जीवनमान सुकर होण्यासाठी आणि अपघात आदींपासून बचावासाठी सदरील जॅकेट आणि रेनकोट उपयुक्त आहेत अशी माहिती फतेह रंधवा यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते हे होते. त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात एफआर एसटी फाउंडेशन मुंबई आणि देवगिरी महाविद्यालय दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी भविष्यातही कार्य करत राहील आणि अंध विद्यार्थ्यांना अध्ययन, अध्यापन, संशोधनासाठी अद्ययावत संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध आहे. देवगिरी महाविद्यालयामध्ये अनेक अंध विद्यार्थी यशस्वीपणे पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन पूर्ण करत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी देवगिरी महाविद्यालयाने विविध ऑडिओ बुक्स, अंध विद्यार्थ्यांसाठीचे सॉफ्टवेअर, ब्रेल लिपी टाईपराईटर, संगणक संच उपलब्ध करून दिले आहेत. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, फाउंडेशनचे रिकीन सहेगल या उपक्रमाचे संयोजक ग्रंथपाल सुदेश डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमामध्ये २०० अंध विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन डॉ वीणा माळी यांनी केले. डॉ सुदेश डोंगरे यांनी आभार मानले.