
– राजेश भोसले, संकल्पक, जलतरण साक्षरता मिशन.

साधारण आठवडा किंवा महिन्याभरामधील पाण्यात बुडून होणाऱ्या अपघातांवर जर आपण नजर टाकली तर आपल्याला असे लक्षात येते की साधारणपणे दोन दिवसाआड एक मृत्यू हा पाण्यात बुडून होतो. म्हणजे आठवड्याला ३ ते ४ तर महिन्याभरात १२ ते १५ मृत्यू हे कोठे ना कोठे म्हणजे वेगवेगळ्या जलस्त्रोतांमध्ये झाल्याचे आपल्या निदर्शनास येईल. (यामध्ये ग्रामीण, शहरी विभागासह सर्वच पर्यटन स्थळे आली)
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार तर जगभरात दररोज ६५० लोकांचा मृत्यू हा पाण्यात बुडून होतो. पाण्यात बुडून होणाऱ्या अपघातांचे जर आपण बारकाईने निरक्षण केले तर यामध्ये ८० % अपघातात एका पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झालेला दिसून येतो असे आपल्या लक्षात येईल. पण यामागच्या कारणांकडे व उपाययोजनांकडे आजपर्यंत कुणीही लक्ष दिलेले नाही किंवा या विषयावर प्रकाश टाकला नाही. पाण्यात बुडत असलेल्या एखाद्या व्यक्तीला दुसरी व्यक्ती वाचवायला जाते आणि दोघेही पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडतात. असे का झाले व यामागची कारणे काय ? प्रश्न असा आहे की बुडणारा तर एकच होता मग दोघांचे मृत्यू कसे व का झाले ? या प्रश्नांकडे आजपर्यंत दुर्लक्ष झालेले आहे.
ज्या घरामधील हसती खेळती मुले अशा प्रकारे अपघातात मृत्यूमुखी पडतात याचे दुःख तेच जाणो. पाण्यात बुडत असलेल्या भावाला वाचवताना दोन्ही भावांचा मृत्यू, बहिणीला वाचवताना दोन्ही बहिणींचा मृत्यू, मुलाला वाचवताना मुलासह वडिलांचा ही मृत्यू, मुलीला वाचवताना मुलीसह आईचाही मृत्यू तर मित्राला वाचवताना दोन्ही मित्रांचा बुडून मृत्यू अशा प्रकाराच्या बातम्या आपण वाचत आलेलो आहोत. वरील सर्व अपघातांमध्ये सुरुवातीला फक्त एकच मृत्यू होणार होता पण दुदैव्याने असे की बुडणाऱ्या सोबत वाचवणारा सुद्धा बुडाला म्हणजे मृत्यूचे प्रमाण दुप्पट झाले.

हे का झाले ? हे कसे झाले ? हे कोठे झाले ? हे कधी झाले ? याची निश्चित कारणे काय ? असे भविष्यात होऊ नये म्हणून मागील २५ वर्षांपासून या विषयावर काम करणारे व जलतरण साक्षरतेचा ध्यास घेतलेले तसेच जल हे जीवन आहे, ते मृत्यूचे कारण ठरू नये म्हणून प्रत्येकाला जल व तरणाची संपूर्ण माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षण व प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने कार्यरत, जागतिक जलतरण साक्षरतेचे संकल्पक राजेश भोसले यांनी लिहिलेला पोहणे सोपे वाचविणे अवघड
हा लेख “जलतरण साक्षरते” मध्ये मैलाचा दगड ठरणार आहे.
पोहणे सोपे….वाचवणे अवघड…प्रथम आपण पोहणे म्हणजे काय ? हे बघू यात.
१) पाण्यात हातापायांची योग्य हालचाल करून तरंगण्याच्या क्रियेस “पोहणे” असे म्हणतात.
२) हातापायांची हालचाल करून नैसर्गिकरितीने पाण्यातून किंवा पाण्यावर पुढे मागे सरकण्याची क्रिया म्हणजे “पोहणे” होय.
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जलतरणाच्या किंवा पोहण्याच्या व्याख्या आपण करू शकतो. परंतु, पोहण्याच्या व्याख्या करणे, व्याख्या लिहिणे, व्याख्या वाचण्या इतपत पोहता येणे निश्चितच सोपे नाही. कारण पोहणे ही क्रिया अंघोळ करण्याइतकी सोपी व सरळ नाही. परंतु, आपण जेव्हा एखादी गोष्ट, एखादे काम किंवा एखादे कौशल्य जाणीवपूर्वक शिकायचे ठरवतो तेव्हा ते निश्चितच सोपे जाते.
प्रथमतः अवघड किंवा कठीण वाटत असलेले एखादे काम आपण केलेल्या निष्ठापूर्वक व सातत्यपूर्ण प्रयत्नांनी सोपे करता येते हे सर्वश्रृत आहे. पाणी व पाण्यात भिजायला, चालायला, फिरायला, बागडायला, विहार करायला सर्वांनाच आवडते. ज्या लोकांना पाण्याची भीती वाटत नाही, थंड पाण्याची सवय आहे, पोहण्याची मनातून इच्छा आहे अश्या लोकांना प्रत्यक्ष पाण्यात जाऊन त्याचा आनंद घेणे व इतरांच्या तुलनेत पोहणे शिकणे सोपे जाते.
जलतरण तलावात किंवा एखाद्या सुरक्षित स्थळी, अनुभव संपन्न व्यक्ती, तज्ञ प्रशिक्षक व मार्गदर्शकाच्या देखरेखीत-निगराणीत-मार्गदर्शनाखाली पोहायला शिकणे सोपे जाते. मन लावून, सातत्य ठेऊन, प्रयत्नपूर्वक, परिश्रम घेऊन पोहणे शिकण्याचा प्रयत्न केल्यास साधारण एक महिन्यात स्वतःला तरंगण्या इतपत आपण पोहायला शिकू शकतो.
सर्वसाधारण पोहणे शिकल्यानंतर आपण आपल्या क्षमतेनुसार पोहण्याच्या विविध प्रकारामध्ये स्पर्धात्मक प्राविण्य प्राप्त करू शकतो. तसे प्रयत्न अनेक जण करतात .
म्हणजेच स्वतःसाठी पोहणे शिकणे सोपे आहे. आपल्याला पोहता येते म्हणजे याचा अर्थ आपण बुडणाऱ्याला वाचवू शकतो असा होत नाही.
पोहता येणे म्हणजे स्वतःला बुडण्यापासून सुरक्षित ठेवणे असा त्याचा अर्थ होतो.
पण एखाद्या प्रसंगी कुणी पाण्यात बुडत असेल तर त्याला वाचवण्यासाठी पोहण्यापेक्षा अधिक प्रमाणात प्रशिक्षित व अनुभवी असणे आवश्यक आहे. म्हणूनच म्हणावे वाटते की पोहणे सोपे…वाचवणे अवघड….
पोहण्याच्या तुलनेत वाचवणे अवघड का आहे ते आपण बघू यात… बुडणे म्हणजे काय ? “बुडणे” म्हणजे पाण्यात किंवा इतर द्रवात पूर्णपणे किंवा अंशतः बुडून श्वास घेण्यास अडथळा येणे. ज्यामुळे गुदमरल्यासारखे होऊन मृत्यू किंवा गंभीर दुखापत होऊ शकते. सोप्या भाषेत, पाण्यात बुडून श्वास कोंडणे किंवा गुदमरणे म्हणजे बुडणे होय. एखादी व्यक्ती काही कारणाने पाण्यात बुडत असेल आणि शेजारी असलेल्या व्यक्तीला त्याला वाचवावे असे वाटणे साहजिक आहे. पण जीवरक्षकाचे प्रशिक्षण न घेता, बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणे म्हणजे त्याच्या सह स्वतःचा जीव धोक्यात घालणे होय .
अशा प्रसंगी एकाच वेळी स्वतःला सुरक्षित ठेऊन बुडणाऱ्याला सुद्धा सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढणे, त्याचा जीव वाचविणे हे मानसिक व शारीरिकदृष्ट्या प्रचंड थकवणारे काम आहे. विना प्रशिक्षण तर हे काम शक्यच नाही. पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवणे म्हणजे रस्त्यावर झालेल्या अपघातामधील व्यक्तींना वाचविणे किंवा त्यांना मदत करण्या इतके सोपे नसते. कारण इतर अपघातामध्ये व्यक्तीचा
हात-पाय तुटू शकतो, रक्तस्त्राव जास्त होवू शकतो किंवा इतर गंभीर दुखापत होऊन अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. पण ते सर्व जमिनीवर असल्यामुळे आपल्याला पाहिजे तशी धावपळ करता येते. कारण सर्वकाही आपल्या डोळ्यांना व्यवस्थित दिसत असल्यामुळे व आपण स्वतःस्थीर असल्यामुळे आपल्याला पाहिजे तो निर्णय घेता येतो म्हणून योग्य अशी मदत करणे सोपे जाते. तुलनेत पाण्यात बुडत असणाऱ्या व्यक्तीला वाचविणे किंवा आवश्यक मदत पोहचविणे तितके सोपे नसते.
पाण्यात इतरांना वाचविण्यासाठी जाण्यापूर्वी प्रत्येकाला माहित असावी अशी महत्वपूर्ण गोष्ट. बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यासाठी लागणारा वेळ (रिअॅक्शन टाईम) हा खूप कमी असतो. अशा प्रसंगी बुडणारी व्यक्ती मृत्यूच्या भीतीने प्रचंड घाबरलेली असते. नाका-तोडांत पाणी गेल्यामुळे त्याची विचार करण्याची क्षमता संपते. त्याला आपण बोललेले किंवा दिलेल्या कोणत्याही सूचना कळत नाही.
वाचवणाऱ्याला बुडणाऱ्याशी संवाद साधणे कठीण जाते. अशा प्रसंगी बुडणाऱ्याची सद्सदविवेक बुद्धी काम करणे बंद करते.
अशा असंख्य अडचणी पाण्यामध्ये वाचवताना येतात. बुडणाऱ्या व्यक्तीला त्वरित मदत न पोहचल्यास त्याचे गंभीर परिणाम होवू शकतात किंवा जीव सुद्धा जावू शकतो. त्यामुळे वाचविणाऱ्याकडे बुडणाऱ्याला वाचविण्याचा वेळ खूप कमी असतो. त्यातल्या त्यात वाचविण्याचा प्रयत्न हा अचूक असावा लागतो. प्रयोग चालत नाही. योगायोग म्हणा किंवा बुडणाऱ्याचे नशीब म्हणा तज्ञ, अनुभवी, प्रशिक्षित जलतरणपटू किंवा जीवरक्षक आसपास किंवा जवळच असेल व त्यांच्याकडे पुरेसे सुरक्षा उपकरणे असतील तर एखाद्याला सुरक्षित वाचविणे शक्य होऊ शकते. अन्यथा फक्त भावना विवश होऊन बुडणाऱ्याला वाचविण्यासाठी पाण्यात जाणे म्हणजे बुडणाऱ्यासह स्वतःचा जीव धोक्यात घालणे होय.
चित्रपटात किंवा मालिकांमध्ये दाखविल्याप्रमाणे एखाद्याला वाचविणे सोपे नसते. म्हणून विना प्रशिक्षण बुडणाऱ्याला वाचविण्याची हिरोगिरी करण्याचा प्रयत्न सर्वसाधारण व्यक्तीने तर करूच नये पण एखाद्या साधारण जलतरणपटूने सुद्धा करू नये. प्रशिक्षण शिवाय पर्याय नाही. सर्वप्रथम बुडणारी व्यक्ती ही वाचविणाऱ्या व्यक्तीला मरणाच्या भीतीने अगदी घट्ट पकडते (त्याची मिठ्ठी इतकी घट्ट असते की
मरणा नंतर जेव्हा अशी प्रेते पाण्याबाहेर काढली जातात तेव्हा सुद्धा ती मिठ्ठी तशीच असते) त्यामुळे वाचविणाऱ्याला हालचाल करणेच कठीण होऊन बसते तर तो वाचविणार कसा ?
स्वतः लाही आणि बुडणाऱ्याला ही ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट प्रत्येकाला माहितीच पाहिजे. पाण्यात बुडणाऱ्यास वाचविण्यासाठी दोन प्रमुख पद्धती आहेत. या पद्धतींचे योग्य व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले असावे. शक्यतो पाण्यात न शिरता वाचवता येणे शक्य असल्यास पाहवे म्हणजे दोरी, काठी, वल्हे, बांबू इत्यादींचा उपयोग करावा व बुडणाऱ्यास त्याच्या आधारे बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा.
१) पहिल्या पद्धतीत – वाचविण्याऱ्याने बुडणाऱ्या माणसाच्या मागे जाऊन त्याच्या छातीवर हात ठेऊन उताणे पकडावे व दुसऱ्या हाताने कुशीवरील हात मारून कडेला आणावे
२) दुसऱ्या पद्धतीत – बुडणाऱ्याचे डोके दोन्ही हातांनी उताणे छातीवर धरून,
उताणे पोहून कड गाठली जाते. या पद्धतीत बुडणाऱ्या व्यक्तीचे तसेच त्याला वाचविणाऱ्याचे डोके पाण्यावर राहते.
या सर्व पद्धती जरी आपल्याला माहित असल्या तरी त्यांचा सराव असणे गरजेचे असते नाही तर सरावा अभावी ही फक्त माहिती ठरते. आपातकालीन परिस्थितीशी निपटण्याचे प्रत्यक्ष ज्ञान व प्रशिक्षण असणे तर आवश्यकच आहे. त्याच बरोबर अशी परिस्थिती हातळण्याचे कौशल्य व सराव असावा. एवढेच नव्हे तर या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी या अनुभवाने साध्य होतात. कारण प्रत्येकवेळी बुडण्याची कारणे, ठिकाण, परिस्थिती ही नेहमी वेगळी असते. बुडणारी व्यक्ती ही स्त्री आहे की पुरुष, लहान आहे की मोठी, पोहता येणारी आहे की नवशिखी, ती जवळच बुडत आहे की दुरवर, तसेच विविध जलस्त्रोतांविषयी सुद्धा सखोल माहिती वाचविण्याऱ्याला असायला पाहिजे.
जलस्त्रोत हा ओळखीचा आहे की अनोळखी, आड, विहीर आहे की बारव, नदी, नाला, पाट, चारी आहे की कालवा, डोह आहे की खदाण, तळे, बंधारा आहे की शेततळे, धबधबा, खाडी आहे की समुद्र, पाणी खोल आहे की उथळ, स्थीर आहे की वाहते, पाण्यात गाळ आहे की कपार इत्यादी सर्व जलस्तोतांचे संपूर्ण ज्ञान वाचविणाऱ्यास असणे खूप अत्यावश्यक असते. कारण याचा फायदा वाचविणाऱ्यास होतो. एखाद्याला वाचविणे अवघड असले तरी अशक्य मात्र नाही. पण त्यासाठी उच्च प्रशिक्षित असायला हवे.
आवाहन
सर्व प्रथम आपण एक सुज्ञ भारतीय नागरिक या नात्याने स्वतः जलतरण साक्षर होऊ यात. आपण आपल्या पाल्यांसह संपूर्ण कुटुंबाला जलतरण साक्षर होण्यासाठी प्रेरित करू यात. तसेच यथावकाश जलतरणाची माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षण व प्रशिक्षणासाठी आग्रही राहून शक्य असल्यास Life Seving – Life Guard चे प्रशिक्षण घेऊ यात किंवा किमान माहिती तरी मिळवू यात.
जलतरण साक्षरतेला “पूण्यकर्म” समजून समाजातील तळागाळापर्यंत ही माहिती पोहचविण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करू यात. यापुढे एकही शाळकरी विद्यार्थी किंवा भारतीय नागरिक पाण्यात बुडून अपघाती मृत्यूमुखी पडणार नाही.
असा प्रयत्न आपण सर्व जण मिळून करू यात असे विनम्र आवाहन आपणास करतो.