
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत हर्ष प्रमोद पाटील याने दोन इव्हेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या शानदार कामगिरीमुळे हर्ष पाटीलची राज्य स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघात निवड झाली आहे.
पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत दहावी इयत्तेत शिकत असलेल्या हर्ष पाटील याने ६० मीटर आणि ८० मीटर हर्डल्स या दोन प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला. या कामगिरीमुळे हर्ष याची पुणे येथे बालेवाडी क्रीडा संकुलात होणाऱया राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे.
हर्ष पाटील याला क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्या पूनम नवगिरे, नाशिक येथील सिद्धार्थ वाघ यांचे मार्गदर्शन लाभत आहे. हर्ष सध्या नाशिक येथे एनआयएस कोच सिद्धार्थ वाघ यांच्याकडे सराव करत आहे. जिल्हा अध्यक्ष श्रीकांत जोशी, जिल्हा सचिव फुलचंद सलामपुरे, डॉ दयानंद कांबळे, पंकज भारसाखळे आदींनी हर्ष याचे अभिनंदन केले आहे.