
मुंबई ः आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी बीसीसीआयने घोषित केलेल्या भारतीय संघ निवडीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. खास करून श्रेयस अय्यर याला वगळण्याच्या निर्णयाबाबत कठोर टीका होत आहे. आता श्रेयसचे वडील संतोष अय्यर यांनी या प्रकरणाबाबत बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
श्रेयस अय्यरचे वडील संतोष अय्यर यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, ‘भारताच्या टी २० संघात समावेश होण्यासाठी श्रेयसने आणखी काय करावे हे मला माहित नाही. दिल्ली कॅपिटल्सपासून कोलकाता नाईट रायडर्सपर्यंत आणि केकेआरपासून पंजाब किंग्जपर्यंत, अय्यर दरवर्षी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे’. श्रेयसच्या वडिलांनी पुढे म्हटले की, ‘२०२४ मध्ये त्याने कर्णधार म्हणून केकेआरला आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आणि २०२५ मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना संघाला अंतिम फेरीत नेले’.
संतोष अय्यर यांनी बीसीसीआयला आणखी घेरले आणि म्हणाले की, ‘मी असे म्हणत नाही की तुम्ही त्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवा, पण किमान त्याला संघात निवडा’. श्रेयसबद्दल बोलताना संतोष अय्यर म्हणाले की, ‘तो नेहमीच म्हणतो की हे माझे भाग्य आहे. तुम्ही यात काहीही करू शकत नाही. तो नेहमीच शांत असतो. तो कधीही कोणावर आरोप करत नाही, परंतु तो आतून खूप निराश असतो’.
२०२५ च्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरचा वादळ
२०२५ च्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरची कामगिरी खूप चांगली होती. अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज ११ वर्षांनी आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरला. कर्णधारपदासोबतच अय्यरने शानदार फलंदाजी केली आणि १७ सामन्यांमध्ये ५०.३३ च्या सरासरीने ६०४ धावा केल्या. आयपीएलच्या १८ व्या हंगामात, या खेळाडूची सर्वोत्तम धावसंख्या ९७ नाबाद होती. या हंगामात अय्यर पाच वेळा नाबाद राहिला.