
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः सुफियान अहमद, विश्वजित राजपूत सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट डी-११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत पूरब जैस्वाल इलेव्हनने मायटी ग्लॅडिएटर्स संघाचा चुरशीच्या लढतीत अवघ्या पाच धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात नाथ ड्रिप संघाने रायझिंग स्टार संघावर सहा विकेट राखून मोठा विजय साकारला.

रुफीट मैदानावर डी ११ टी २० लीग स्पर्धा होत आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसामुळे स्पर्धेला खंड पडला होता. आता स्पर्धा पुन्हा नव्या जोमाने सुरू होत आहे, असे संयोजक निलेश गवई यांनी सांगितले.

गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पूरब जैस्वाल इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकात सर्वबाद १४१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना मायडी ग्लॅडिएटर्स संघ २० षटकात नऊ बाद १३६ धावा काढू शकला. अवघ्या पाच धावांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
या लढतीत आकाश अभंग याने चार चौकार व चार षटकारांसह ५८ धावा फटकावल्या. फारूक कुरेशी (४०), अविनाश मोटे (३०) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत मुबीन सय्यद (३-१५), अनिल थोरे (३-२०) व गुड्डू नेहरी (२-१२) यांनी प्रभावी गोलंदाजी करत विकेट घेतल्या. या सामन्यात पूरब जैस्वाल संघाचा सुफियान अहमद याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
रायझिंग स्टार पराभूत
दुसऱ्या सामन्यात रायझिंग स्टार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात नऊ बाद ११२ धावा काढल्या. त्यानंतर नाथ ड्रिप संघाने १५.५ षटकात चार बाद ११३ धावा फटकावत सहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला.
या लढतीत विश्वजित राजपूत याने ५० चेंडूत ५३ धावांची वेगवान खेळी केली. त्याने सात चौकार व एक षटकार मारला. उत्कर्ष फंड याने दोन षटकार व तीन चौकारांसह ३९ धावांची आक्रमक खेळी केली. अक्षय गिरेवाड याने २५ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत विकास पवार (३-१४), अमोल उदावंत (२-२८) व राहुल जोनवाल (१-११) यांनी अचूक मारा करत विकेट घेतल्या. या सामन्यात विश्वजित राजपूत हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.