 
            राज्यस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान
छत्रपती संभाजीनगर ः पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या धर्मवीर संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त आंतरशालेय मुला-मुलींच्या खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत आ कृ वाघमारे प्रशाला आणि सरस्वती भुवन
हायस्कूल या संघांनी विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागातून मुलांचे १६ संघ आणि मुलींचे ५ संघ एकूण २१ संघ सहभागी झाले होते. माजी नगरसेवक शिवाजीराव दांडगे पाटील तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय संस्थेचे प्रतिनिधी सोमनाथ मेटे, प्राचार्य लक्ष्मण मेमाणे, तसेच पर्यवेक्षक दिलीप गायके, संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी संचालक महेश कुलकर्णी, क्रीडा शिक्षक विनायक राऊत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
विजेत्या संघांना राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बागडे नानांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बागडे नानांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव निवृत्ती पाटील गावंडे, उपाध्यक्ष देवजीभाई पटेल, संस्थेचे संचालक तथा मार्गदर्शक डॉ सर्जेराव ठोंबरे, दामूअण्णा नवपुते, मंगेश करंदीकर तसेच क्रीडा संघटक गोविंद शर्मा आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कैलास कुबेर, क्रीडा शिक्षक विनायक राऊत यांनी केले. अर्जुनराव दांडगे यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंतिम निकाल
मुलींचा गट ः १. आ कृ वाघमारे प्रशाला, २. माँटेसोरी बालक मंदिर, ३. धर्मवीर संभाजी विद्यालय.
मुलांचा गट ः १. सरस्वती भुवन हायस्कूल, २. यशवंतराव चव्हाण हायस्कूल, ३. धर्मवीर संभाजी विद्यालय.



