
शिर्डी ः भारतीय रस्सीखेच संघटना, महाराष्ट्र रस्सीखेच असोसिएशन, अहिल्यानगर जिल्हा रस्सीखेच असोसिएशन व साईबाबा महाविद्यालय शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सब-ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा व ३८व्या ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद गौतम कप स्पर्धेचे शनिवारी (२३ ऑगस्ट) उद्घाटन होणार आहे.
या स्पर्धेमध्ये १३, १५, १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या गटांसह, १९ वर्षांखालील मुले, मुली मिक्स गट, तसेच वरिष्ठ गटातील रस्सीखेच सामने रंगणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेतून भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (२३ ऑगस्ट) दुपारी ४ वाजता होणार आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर, भारतीय रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष हरि शंकर गुप्ता, महासचिव मदन मोहन, महाराष्ट्र रस्सीखेच संघटनेच्या अध्यक्ष माधवी पाटील व महासचिव जनार्दन गुपीले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अहिल्यानगर जिल्हा रस्सीखेच असोसिएशनचे अध्यक्ष ॲड सुहास आहेर, सचिव प्रा बाबा गायकवाड, सुनील मंडलिक, राजेंद्र थोरात, नंदलाल काळण, भागवत उगले, निवृत्ती घुले व इतर पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.