
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः डॉ मयूर राजपूत, धीरज बहुरे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यांमध्ये मायटी ग्लॅडिएटर्स आणि यंग ११ या संघांनी दमदार विजय साकारत आगेकूच केली. या लढतींमध्ये डॉ मयूर राजपूत व धीरज बहुरे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.
रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात मायटी ग्लॅडिएटर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात आठ बाद १६२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एसडब्ल्यू मल्टीमीडिया संघाने १९.२ षटकात सर्वबाद १५० धावा काढल्या. मायटी ग्लॅडिएटर्स संघाने हा चुरशीचा सामना अवघ्या १२ धावांनी जिंकला. या लढतीत डॉ मयूर राजपूत यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला.
या सामन्यात सचिन वाठोरे याने आक्रमक अर्धशतक ठोकले. सचिनने ३८ चेंडूंत ५३ धावा फटकावल्या. त्यात त्याने पाच चौकार व तीन षटकार मारले. डॉ मयूर राजपूत याने ४३ चेंडूत ४० धावांची आक्रमक खेळी केली. त्याने दोन चौकार मारले. सम्राट राज याने १९ चेंडूत २७ धावांची तुफानी खेळी केली. त्याने चार चौकार मारले. गोलंदाजीत काझिम खान याने १७ धावांत तीन विकेट घेत शानदार प्रदर्शन केले. झमीर याने २५ धावांत दोन तर अनिल थोरे याने ३१ धावांत दोन गडी बाद केले.
यंग इलेव्हनची स्फोटक फलंदाजी
दुसऱ्या सामन्यात यंग इलेव्हन संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवले. यंग इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी महारन ११ संघाला १९.४ षटकात अवघ्या ९९ धावांवर रोखून कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. त्यानंतर यंग ११ संघाने अवघ्या ८.३ षटकात एक बाद १०३ धावा फटकावत नऊ विकेट राखून मोठा विजय संपादन केला.
महारन ११ संघाकडून अर्जुन घुसिंगे याने सर्वाधिक ३६ धावांचे योगदान दिले. त्याने तीन षटकार व एक चौकार मारला. गोपाल बहुरे (१०), करण राजपूत (नाबाद १०) यांना धावांचा दुहेरी आकडा गाठण्यात यश आले. गोलंदाजीत स्वप्नील चव्हाण याने प्रभावी गोलंदाजी करत २२ धावांत तीन विकेट घेऊन सामना गाजवला. संदीप सहानी याने १२ धावांत दोन गडी बाद करुन त्याला सुरेख साथ दिली. नकुल हजारी याने १५ धावांत दोन बळी टिपले. ऋषिकेश तरडे (१-१४), शुभम मोहिते (१-११) यांनी एक गडी बाद केला.
यंग ११ संघासमोर विजयासाठी १०० धावांचे लक्ष्य होते. धीरज बहुरे आणि मधूर पटेल या सलामी जोडीने धमाकेदार फलंदाजी करुन संघाला स्फोटक सुरुवात करुन दिली. धीरज-मधूर या सलामी जोडीने ९९ धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. विजयासाठी केवळ एका धावेची गरज असताना मधूर पटेल ४१ धावांवर बाद झाला. त्याने २५ चेंडूत चार चौकार व दोन षटकार मारले. धीरज बहुरे याने अवघ्या २७ चेंडूत नाबाद ५१ धावांची दमदार खेळी केली. त्याने पाच चौकार व तीन षटकार मारले. धीरज बहुरे व मधूर पटेल या सलामी जोडीने चौकार व षटकारांचा पाऊस पाडत सामना गाजवला. धीरज बहुरे याने सामनावीर पुरस्कार संपादन केला. या सामन्यात स्वप्नील चव्हाण (३-२२), संदीप सहानी (२-१२) व नकुल हजारी (२-१५) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.