
मुंबई ः बाळ गोपाळ (अभिलाषा) गणेशोत्सव मंडळ-काळाचौकी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे पुरस्कृत विविध जिल्ह्यातील १८ वर्षांखालील इयत्ता १२ वीपर्यंत शालेय मुला-मुलींसाठी गणाधीश चषक विनाशुल्क कॅरम स्पर्धा ५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
विभागीय ज्युनियर खेळाडूंच्या उत्स्फूर्त मागणीनुसार आणि गत स्पर्धेस लाभलेल्या मोठ्या प्रतिसादामुळे शालेय कॅरम स्पर्धा आमच्या गणेशोत्सवामधील एक अविभाज्य उपक्रम ठरत असल्याची माहिती गणाधीश मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील शिंगे व सेक्रेटरी सिद्धेश ढोलम यांनी दिली.
चॅम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा बाद पद्धतीने काळाचौकी येथील गणाधीश श्री मंडपात होईल. पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्कार देऊन माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. खेळाडूंना स्पर्धेदरम्यान विशेष मार्गदर्शन देखील मोफत लाभणार आहे. सदर स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित शालेय खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी रवींद्र गोनबरे किंवा अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याकडे २२ ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा.