
पुणे : एम्पॉवर हर फाउंडेशनतर्फे यांच्या वतीने आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ‘एआयटीए-एमएसएलटीए एक लाख रुपयांची अखिल भारतीय महिला मानांकन टेनिस स्पर्धेत एकेरीत महाराष्ट्राच्या ललित्या कल्लूरी, सोनल पाटील, गुजरातच्या सायली ठक्कर, आंध्र प्रदेशच्या चंदना पोटुगरी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टवर व संदीप किर्तने टेनिस अकादमी, भारत स्पोर्ट्स इव्हॉल्युशन, मायमेंटल कोच, योल्कशायर तसेच संचेती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या ललित्या कल्लूरी हिने कर्नाटकच्या श्री तन्वी दासरीचा ९-३ असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित सोनल पाटील हिने आठव्या मानांकित कर्नाटकच्या भारतीयाना बाबू रेड्डीचे आव्हान ९-१ असे संपुष्ठात आणले. उपांत्य फेरीत सोनल पाटील समोर गुजरातच्या सायली ठक्करचे आव्हान असणार आहे.

चौथ्या मानांकित आंध्र प्रदेशच्या चंदना पोटुगरीने सातव्या मानांकित गुजरातच्या आरुषी रावळचा ९-१ असा सहज पपराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. तिसऱ्या मानांकित गुजरातच्या सायली ठक्कर हिने कर्नाटकच्या पाचव्या मानांकित हृदयेशी पैचा ९-३ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.