
राज्य विजेत्या संघाचा खास सत्कार
ठाणे ः खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह मध्ये ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या मिनी राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ठाणे महापालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
पारंपरिक पद्धतीने नारळ वाढवून व नेटला हार घालून संदीप माळवी यांनी उद्घाटन केले. या स्पर्धा ९, ११, व १३ या वयोगटासाठी आयोजित केली आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यामधून ६५० खेळाडू सहभागी झाले आहेत.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना संदीप माळवी यांनी या स्पर्धेत भाग घेणाऱ्या चिमुकल्या बॅडमिंटनपटूंचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे नमूद केले. तसेच या स्पर्धा उत्तम प्रकारे आयोजित केल्याबद्दल ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे कौतुक केले. तसेच सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेला स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, एचडीएफसी तसेच सारस्वत बँक यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. या कार्यक्रमास विशेष उपस्थित म्हणून ताराचंद ग्रुपचे चेअरमन विनय अग्रवाल व स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे शुभम राखे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास खेळाडू व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सलग दुसऱ्यांदा राज्य विजेतेपद पटकावणाऱ्या ठाण्याच्या पुरुष संघाचा संदीप माळवी यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला. समारंभाचे सूत्रसंचालन ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड यांनी केले.