
विद्यार्थीदशेपासून प्रत्येकाने खेळ आत्मसात केल्यास भारत देश निरोगी युवकांचा देश बनेल – अॅड. दीपक सुळ
लातूर ः कोणताही ऑलिम्पिक खेळ प्रकार शिकल्यास शारीरिक आणि मानसिक कणखरता आपोआप येते. त्याशिवाय अंगी शिस्त देखील बाणली जाते. म्हणूनच खेळाचे बाळकडू बालपणापासूनच देशाच्या भावी नागरिकांना दिले गेल्यास आपला देश निरोगी आणि सुदृढ युवकांचा देश ओळखला जाईल असे प्रतिपादन अॅड दीपक सुळ यांनी केले.
सुळ पुढे म्हणाले की, युद्धकला क्रीडा प्रकारात अत्यंत शिस्त असते आणि त्यामुळे ज्युदो खेळाचे खेळाडूना आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या मिलिटरी आणि पॅरा-मिलिटरी फोर्सेससह पोलीस दलामध्ये देखील सेवा करण्याची संधी मिळते. खेळ शिकल्याने आरोग्यासह उत्तम भविष्याची सुनिश्चिती होते म्हणूनच या देशातील प्रत्येक बालकाने कोणतातरी खेळ शिकलाच पाहिजे असे आग्रही प्रतिपादन सुळ यांनी केले.
बार्शी रोडवरील गिरवलकर मंगल कार्यालयामध्ये पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ५२व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर गटाच्या स्पर्धेचे शनिवारी उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे अध्यक्ष आणि लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक हे होते. या प्रसंगी योगेश गिरवलकर, सिद्धेश्वर बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचलन डॉ अशोक वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक लातूर ज्युदो संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप देशमुख यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर राज्य ज्युदो संघटनेचे महासचिव दत्ता आफळे, कोषाध्यक्ष रवींद्र मेटकर, उपाध्यक्ष डॉ गणेश शेटकर, सुरेश समेळ, मुकूंद डांगे, तिलक थापा, दिनेश बागूल, राज्य तांत्रिक समितीच्या अध्यक्षा दर्शना लाखाणी, सचिव योगेश धाडवे, अतुल बामनोदकर, सचिन देवळे, निखील सुवर्णा, स्पर्धा संचालक योगेश शिंदे यांसह लातूर ज्युदो संघटनेचे सचिव आशिष क्षीरसागर, डॉ संपत साळुंके, डॉ अशोक वाघमारे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, उद्घाटन कार्यक्रमावेळी राज्याचा सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या ज्युदो खेळातील शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू यशवंत दांगट, प्रसाद मोकाशी, अतुल शेलार आणि तुषार मालोदे यांच्यासह नुकतीच आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले सुरेश कनोजिया यांचा सत्कार करण्यात आला.