
९ देशातील खेळाडू सहभागी
पुणे : पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टी स्मृती करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत ९ देशातील २९६ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. ही स्पर्धा पी ई सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये २६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत रंगणार आहे.
पीडीएमबीएचे वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय जुनियर कॅलेंडरमधील सुशांत चिपलकट्टी याच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या हि प्रतिष्ठेची अशी स्पर्धा आहे. स्पर्धेत भारत, युएइ, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, आर्यलँड, इंग्लंड, तैपेई, जपान या ९ देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून या स्पर्धेच्या माध्यमातून देशातील विशेषतः राज्यातील खेळाडूंना व प्रेक्षकांना त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेचे मानद सचिव सीए रणजीत नातु यांनी सांगितले की, ‘जगभरात कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील प्रतिष्ठेची बॅडमिंटन स्पर्धा केवळ चार देशांमध्ये आयोजित केली जात असते. कुमार जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर ही एकमेव अशी भव्य स्पर्धा आहे. जागतिक संघटेनच्या वतीने थेट पुण्यात या स्पर्धेचे अधिकृतरीत्या आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेला योनेक्स सनराईज यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे.
पीडीएमबीएचे खजिनदार सारंग लागू म्हणाले की, ‘वर्षानुवर्षे या स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावत चालला आहे. जगभरातून या स्पर्धेत खेळाडू सहभागी होत आहे ही आपल्या शहरासाठी व संघटनेसाठी अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. “सुशांत चिपलकट्टी हा प्रतिभावान बॅडमिंटनपटू होता. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा बॅडमिंटनपटूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी स्पर्धा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. तसेच, या स्पर्धेतील महत्वपूर्व गुणांमुळे त्यांच्या आगामी कारकिर्दीसाठी या स्पर्धेचा नक्कीच फायदा होत आहे. विशेष म्हणजे याआधीच्या मालिकेत सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, सात्विक साईराज, श्रीकांत किदांबी, प्रियांशु राजावत, चिराग शेट्टी हे नामांकित भारतीय बॅडमिंटनपटूदेखील सहभागी झाले होते.
तसेच, ही स्पर्धा १९ वर्षांखालील मुले व मुली एकेरी, १९ वर्षांखालील मुले व मुली दुहेरी गट आणि मिश्र अशा पाच गटात पार पडणार आहे. यावेळी यावेळी पत्रकार परिषद स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग आणि स्पर्धा संचालक सुधांशू मेडसिकर आदी मान्यवर उपस्थित होते
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी
महिला एकेरी : १. इशिता नेगी (भारत), २. दिशा संतोष (भारत), ३. दुर्गा ईशा कोंडारापू (भारत), ४. प्रशांसा बोनम (भारत).
पुरुष एकेरी : १. रौनक चौहान (भारत), २. ह्युगा ताकानो (जपान), ३. रियान मल्हान (यूएई), ४. सूर्यक्ष रावत (भारत).