एमपीपी स्पोर्ट्स पार्क येथे उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन-जिम्नॅस्टिक्स हॉलचे मंगळवारी लोकार्पण

  • By admin
  • August 24, 2025
  • 0
  • 83 Views
Spread the love

अवघ्या १२० दिवसांत उभारणी, गोपाल पांडे आणि संकर्षण जोशी यांची माहिती  


छत्रपती संभाजीनगर ः एमपीपी स्पोर्ट्स पार्क अँड रिसॉर्टतर्फे उभारण्यात आलेल्या नूतन बॅडमिंटन हॉलचे अनावरण आणि क्रीडा पितामह पुरस्कार वितरण सोहळा २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. 

एमपीपी स्पोर्ट्स पार्क अँड रिसॉर्टचे संचालक अॅड संकर्षण जोशी, अॅड गोपाल पांडे आणि विनायक पांडे यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत याविषयी सखोल माहिती दिली. या प्रसंगी बॅडमिंटन प्रशिक्षक हिमांशू गोडबोले आणि मनीष जांगीड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

वानखेडे नगर परिसरात एमपीपी स्पोर्ट्स पार्क आहे. एमपीपी स्पोर्ट्स पार्क परिसरात आता आणखी एक नवीन आधुनिक सुविधा क्रीडा क्षेत्रासाठी उपलब्ध होत आहे. अत्याधुनिक तीन बॅडमिंटन कोर्ट असलेला सुसज्ज हॉल आणि जिम्नॅस्टिक्स हॉलचे उद्घाटन मंगळवारी करण्यात येणार आहे. ६५०० स्क्वेअर फूट व ४० फूट उंचीची बंदिस्त हॉल या दोन खेळांच्या सुविधांसह खेळाडूंना लवकरच उपलब्ध होणार आहे. 

उद्घाटन सोहळा

हिमायत बाग परिसरातील गट नंबर २३ येथे असलेल्या एमपीपी स्पोर्ट्स  पार्क या ठिकाणी बॅडमिंटन व जिम्नॅस्टिक्स हॉलची उभारणी करण्यात आली आहे. या वास्तूचे उद्घाटन मद्रास उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रसंगी आमदार प्रदीप जैस्वाल, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे, अशी माहिती संकर्षण जोशी, गोपाल पांडे यांनी यावेळी दिली. 

क्रीडा पितामह पुरस्कार

या कार्यक्रमात एमपीपी स्पोर्ट्स पार्कतर्फे दरवर्षी देण्यात येणारा क्रीडा पितामह पुरस्कार यंदा ज्येष्ठ चंद्रपाल दंडिमे यांना प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठात व्हॉलीबॉल खेळाचे प्रशिक्षक म्हणून चंद्रपाल  दंडिने यांची कारकीर्द गाजली आहे. वयाच्या ८२व्या वर्षी देखील चंद्रपाल दंडिमे हे युवांना लाजवतील असा फिटनेस राखून आहेत असे गोपाल पांडे व संकर्षण जोशी यांनी सांगितले. यापूर्वी हा पुरस्कार दारियस नरिमन व विवेक घारपुरे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 

अवघ्या १२० दिवसांत उभारणी 

मनीष जांगीड यांनी अवघ्या १२० दिवसांमध्ये बॅडमिंटन कोर्ट व जिम्नॅस्टिक्स हॉलची उभारणी केली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी भूमिपूजन करण्यात आले होते. सोलार पॅनलने सुसज्ज असा हा हॉल उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी २४ तास वीज उपलब्ध होऊ शकणार आहे. कोणत्याही अडथळ्याविना या ठिकाणी प्रशिक्षण आणि स्पर्धांचे आयोजन होऊ शकेल असे संकर्षण जोशी यांनी सांगितले. 

क्रीडा संस्कृती 

ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहराची क्रीडा संस्कृती वैभवशाली आहे. या शहरात अनेक खेळ पूर्वीपासून रुजले आहेत तर काही क्रीडा प्रकार नव्याने प्रगती करत आहेत. या क्रीडा वैभवात अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर शहराचा नावलौकिक वाढवत आहेत. ही क्रीडा संस्कृती रुजली ती अनेक संस्था, उद्योग क्षेत्रातील सामाजिक जाणीव असलेले काही उद्योजक तर काही सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा संघटक यांनी विविध खेळांची सुसज्ज व आधुनिक मैदाने निर्माण केली. शहर जस जसे प्रगत होऊन स्मार्ट सिटीकडे वाटचाल करू लागले त्यानुसार या शहरात खेळाडूंसाठी अनेक मैदाने भविष्यात निर्माण होणार आहेत याची खात्री आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा  अत्याधुनिक हॉल बनवण्यात आला आहे असे माजी नगरसेवक विनायक पांडे यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *