
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः मगनसिंग घुनावत, आशिष पवार सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यांमध्ये महारन ११ आणि इथिकल क्रिकेट अकादमी या संघांनी चुरशीचे विजय नोंदवत आगेकूच केली आहे. इथिकल अकादमीने २८ धावांनी सामना जिंकला तर महारन ११ संघाने दोन विकेट राखून विजय साकारला आहे. या लढतींमध्ये मगनसिंग घुनावत आणि आशिष पवार यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात एमजीएम क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १७.४ षटकात सर्वबाद १४१ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना महारन ११ संघाने १६.२ षटकात आठ बाद १४५ धावा फटकावत दोन विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात अक्षय बनकर याने तुफानी फलंदाजी केली. अक्षयने अवघ्या ३१ चेंडूत ७१ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार व सहा षटकार ठोकले. अर्जुन गुसिंगे याने तीन षटकार व दोन चौकारांसह ३९ धावांची स्फोटक खेळी साकारली. वीर राठोड याने १७ चेंडूत ३४ धावा काढल्या. त्याने पाच चौकार व दोन षटकार मारले. गोलंदाजीत रामेश्वर दौड (३-२८), मदनसिंग घुनावत (३-२१) व लहू (२-१०) यांनी प्रभावी गोलंदाजी करुन सामना गाजवला. या सामन्यात मदनसिंग घुनावत याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

इथिकल संघाची प्रभावी गोलंदाजी
दुसऱ्या सामन्यात इथिकल क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊ बाद १३२ असे माफक लक्ष्य उभे केले. मात्र, इथिकल अकादमीच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत झैनब सहारा संघाला १९ षटकात १०४ धावांवर बाद करुन संघाला २८ धावांनी विजय मिळवून दिला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात हरिओम काळे (२९), आशिष पवार (२५), संतोष भारती (२१) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत योगेश लिंगायत (२-९), राजेश शिंदे (२-१२) आणि मोसिन चाऊस (२-१७) यांनी भेदक मारा करत प्रत्येकी दोन बळी घेतले. या सामन्यात आशिष पवार याने सामनावीर पुरस्कार मिळवला.