
दक्षिण आफ्रिका संघाने मालिका २-१ ने जिंकली
मॅके ः तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला २७६ धावांनी हरवून ऑस्ट्रेलिया संघाने मोठा चमत्कार केला. तथापि, पहिले दोन सामने गमावल्यामुळे कांगारू संघाने मालिका १-२ अशी गमावली, परंतु शेवटच्या सामन्यातील हा मोठा विजय त्यांच्यासाठी प्रतिष्ठा वाचवणारा होता.
मॅके येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि केवळ दोन विकेट गमावून ४३१ धावांचा मोठा स्कोअर केला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मिशेल मार्शने वादळी सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी २५० धावा जोडल्या.
ऑस्ट्रेलियाने झळकावले ३ शतके
हेडने १०३ चेंडूत १७ चौकार आणि ५ षटकारांसह १४२ धावा केल्या, तर मार्शने ५ षटकार आणि ६ चौकारांसह १०६ धावांची कर्णधारी खेळी केली. त्यानंतर कॅमेरॉन ग्रीन आणि अॅलेक्स कॅरी यांनी संघाला आणखी बळकटी दिली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची नाबाद भागीदारी केली. ग्रीनने फक्त ५५ चेंडूत ८ षटकार आणि ६ चौकारांसह ११८ धावांची नाबाद खेळी केली, तर कॅरीने ५० धावांचे योगदान दिले.
कूपर कॉनॉलीने चेंडूने कहर केला
लक्ष्य पाठलाग करण्यासाठी उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर पूर्णपणे कोसळला आणि केवळ २४.५ षटकात १५५ धावांवरच गारद झाला. या विजयाचा नायक २२ वर्षीय तरुण फिरकी गोलंदाज कूपर कॉनॉलीने ६ षटकात २२ धावा देत ५ बळी घेतले. कॉनॉलीने ३८ वर्षांचा विक्रम मोडून नवा इतिहास रचला. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ बळी घेणारा सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला. त्याने क्रेग मॅकडरमॉटचा विक्रम मोडला. क्रेग मॅकडरमॉटने १९८७ मध्ये लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध २२ वर्षे २०४ दिवसांच्या वयात ५ बळी घेतले. कूपर कॉनोलीने वयाच्या अवघ्या २२ वर्षे आणि २ दिवसांत ही महान कामगिरी केली.
५ बळी घेणारा सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन गोलंदाज
२२ वर्षे २ दिवस – कूपर कॉनोली विरुद्ध दक्षिण आफ्रिका | मॅके, २०२५
२२ वर्षे २०४ दिवस – क्रेग मॅकडर्मॉट विरुद्ध पाकिस्तान | लाहोर, १९८७
२२ वर्षे २११ दिवस – मिचेल स्टार्क विरुद्ध पाकिस्तान | शारजाह, २०१२