
अनुष्का कुमारीची हॅटट्रिक
नवी दिल्ली ः अनुष्का कुमारीच्या हॅटट्रिकमुळे सॅफ अंडर-१७ महिला अजिंक्यपद स्पर्धेत भारताने यजमान भूतानचा ८-० असा पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला.
अनुष्काच्या (५३ व्या, ६१ व्या, ७३ व्या) शानदार कामगिरीव्यतिरिक्त, अभिस्ता बसनेट (२३ व्या, ८९ व्या) यांनी प्रत्येकी दोन गोल केले तर पर्ल फर्नांडिस (७१ व्या), दिव्यानी लिंडा (७७ व्या) आणि व्हॅलिना जादा फर्नांडिस (९०+२ व्या) यांनी गोल केले.
मध्यांतरापर्यंत भारतीय संघ १-० ने आघाडीवर होता. परंतु, दुसऱ्या हाफमध्ये भारताने वर्चस्व गाजवले आणि एकतर्फी विजय नोंदवला. भारताने स्पर्धेत आतापर्यंत १७ गोल केले आहेत तर त्यांच्याविरुद्ध एकही गोल झालेला नाही. या विजयासह, संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर आपली पकड मजबूत केली आहे. भारताचे आता तीन सामन्यांत नऊ गुण आहेत, ते बांगलादेश आणि नेपाळपेक्षा खूप पुढे आहेत. या दोन्ही संघांचे प्रत्येकी तीन गुण आहेत. भूतानचे खाते अजून उघडलेले नाही.