बहिणाबाईंचे साहित्य म्हणजे लोक पुरस्कार – किरण डोंगरदिवे

  • By admin
  • August 25, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

कवयित्री बहिणाबाई चौधरींची जयंती बहिणाई स्मृति संग्रहालयात साजरी

जळगाव ः ‘नको नको रे ज्योतिषा हात माझा पाहू..’ या बहिणाईंच्या काव्यपंक्ती आजच्या समाजाला जीवन समृद्ध करणारे तत्वज्ञान सांगून जाते. साधारणत: शंभर वर्षापूर्वी साहित्यातून बहिणाबाई चौधरी यांनी जो विचार समाजा पुढे ठेवला त्यातून आजची पिढी घडत आहे, असे प्रतिपादन कवी किरण डोंगरदिवे यांनी येथे केले आहे.

अध्यात्मासह विज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कर्मावर विश्वास ठेवण्यास शिकवते. या शिकवणीवर साहित्य क्षेत्रातील नामांकित ज्ञानपीठ, साहित्य अकादमी सह अन्य पुरस्कार त्यांच्या ओव्यांपुढे मागे पडून जातात कारण मराठीतील प्रत्येक साहित्यिक, विद्यार्थी, अभ्यासक हे बहिणाबाईंच्या कविता वाचल्याशिवाय राहत नाही हेच खऱ्या अर्थाने त्यांचा ‘लोक पुरस्कार’ होय. जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. यातून व्यक्तिमत्व घडते येणाऱ्या पाच वर्षानंतर बहिणाबाई चौधरींची १५० वी जयंती निमित्त संतवाणी व बहिणाबाईंच्या गाण्यांसाठी विशेष कार्यक्रम शासनाने शाळांमध्ये घेतले पाहिजे अशी अपेक्षाही कवी किरण डोंगरदिवे यांनी व्यक्त केली.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात ‘बहिणाबाईंचे भावविश्व’ या कार्यक्रमादरम्यान प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून किरण डोंगरदिवे (बुलढाणा) बोलत होते. त्यांच्यासमवेत कवयित्री रेणुका पुरोहित (पुणे), बहिणाबाईंच्या पणतसून पद्माबाई चौधरी, स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, अशोक चौधरी, कांचन खडके उपस्थित होते.

रेणुका पुरोहित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माणसाने शिक्षण घेतले म्हणजे तो साक्षर झाला असे नाही तर आपल्या आई-वडील, शेती-मातीतून जे आपण बघतो त्यातून जे शिकतो त्यातून आलेले शहाणपण आपल्याला शिक्षित करत असते. तसा सजग दृष्टिकोन आपल्यात हवा. माणसं वाचून समृद्ध करण्याचा दृष्टीकोन बहिणाबाईंनी कवितेतून आपल्याला दिला. दोन श्वासातील अंतर सांगून मनुष्याला संस्कारित करण्याचे अध्यात्मिक तत्वज्ञान सुद्धा बहिणाबाईंच्या कवितेतून मिळते.

ज सू खडके विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. उपस्थित गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यामधील जयश्री मिस्त्री यांनी अरे संसार संसार या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक विजय जैन यांनी केले. त्यात त्यांनी संवेदनशीलतेतून श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी हा ट्रस्ट उभा केल्याचे सांगितले. भारती कुलकर्णी यांनीही परिसरात राहत असतानाच्या आठवणी सांगत बहिणाबाईंच्या ओवी म्हटल्या.

कार्यक्रमाप्रसंगी रामपेठ चौधरी वाड्यातील भानुदास नांदेडकर, वैशाली चौधरी, कविता चौधरी, शोभा चौधरी, निलमा चौधरी, दिपाली चौधरी, कीर्ती चौधरी, सुनंदा चौधरी, शितल चौधरी, कोकिळा चौधरी, श्रृती चौधरी यांच्यासह चौधरी वाड्यातील नागरीक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी देवेंद्र पाटील, जितेंद्र झंवर, प्रदीप पाटील, दिनेश थोरवे, राजेंद्र माळी, समाधान महाजन, शरद धनगर यांनी सहकार्य केले.

ज्ञानेश्वर शेंडे यांनी अतिथींचा परिचय करुन दिला. किशोर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *