
मुंबई ः साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे १०५ वी जयंती सोहळ्याचा समाज प्रबोधन मेळाव्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सन्मान सोहळा कार्यक्रमात कुस्ती क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल वस्ताद वसंतराव पाटील यांचा समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण स्मृती भवन टाऊन हॉल कराड येथे कार्यक्रम संपन्न झाला. रॅमन मॅगसेस व पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ प्रकाश आमटे, डॉ मंदाकिनी आपटे यांच्या हस्ते वसंतराव पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मीरा भाईंदर येथे पाटील यांनी पुढाकार घेऊन श्री गणेश आखाडा स्थापन केला. तिथे पाटील युवा कुस्तीपटू तयार करण्याचे कार्य गेली चार दशके करत आहेत.
या प्रसंगी प्रा मच्छिंद्र सकटे, डॉ शरद गायकवाड, शाहीर चंदन कांबळे, अभिनेत्री शिवानी मुंडेकर तसेच जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राम दाभाडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नजरुद्दीन नायकवडी, अमोल साठे हे देखील उपस्थित होते. पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबदल आखाड्यातील सर्व पैलवान, पालक, पदाधिकारी तसेच समस्त भाईंदर व शिराळावासी यांच्यातर्फे त्यांचे खास अभिनंदन करण्यात येत आहे.