असरार इलेव्हन, इम्रान पटेल संघांची आगेकूच 

  • By admin
  • August 25, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

डी ११ टी २० लीग क्रिकेट ः मुकीम शेख, व्यंकटेश सोनवलकर सामनावीर 

छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात असरार इलेव्हन संघाने एमई क्रिकेट अकादमी संघाचा ४९ धावांनी पराभव केला. दुसऱया सामन्यात इम्रान पटेल २२ नाबाद संघाने मल्टीमीडिया संघावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या लढतीत मुकीम शेख व व्यंकटेश सोनवलकर यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात असरार इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवताना फलंदाजांनी २० षटकात चार बाद १७८ अशी भक्कम धावसंख्या उभारुन दिली. या धावसंख्येमुळे असरार संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना एमई क्रिकेट अकादमी संघ २० षटकात आठ बाद १२९ धावा काढू शकला. असरार संघाने ४९ धावांनी सामना जिंकला. या लढतीत मुकीम शेख याने सामनावीर पुरस्कार संपादन केला. 
सामनावीर मुकीम शेख याने ६१ चेंडूत ८२ धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. मुकीमने १० खणखणीत चौकार मारले. आदर्श जैन याने तुफानी फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. आदर्श जैन याने ३१ चेंडूत ५४ धावा फटकावल्या. त्यात त्याने तीन चौकार व चार उत्तुंग षटकार मारले. संकेत पगारे याने दोन षटकार व चार चौकारांसह ३६ धावांची आक्रमक खेळी साकारली. गोलंदाजीत जेके याने १९ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. शेख सादिक याने १४ धावांत दोन बळी टिपले. आदर्श जैन याने २ धावांत एक विकेट घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली.

व्यंकटेशची प्रभावी कामगिरी
दुसरा सामना गोलंदाजांनी गाजवला. एसडब्ल्यू मल्टीमीडिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय त्यांना मोठा महागात पडला. मल्टीमीडिया संघ १३.४ षटकांच्या खेळात अवघ्या ६२ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर इम्रान पटेल २२ नाबाद संघाने अवघ्या पाच षटकात एक बाद ६५ धावा फटकावत नऊ विकेट राखून सामना जिंकला.

कमी धावसंख्येच्या या लढतीत आकाश बोराडे (३७) याने आक्रमक फलंदाजी करताना दोन चौकार व चार टोलेजंग षटकार मारले. प्रदीप जगदाळे याने २० धावा फटकावताना एक चौकार व दोन षटकार मारले. आयुष बुगडे याने दोन चौकारांसह १५ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत व्यंकटेश सोनवलकर याने १४ धावांत चार गडी बाद करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मोहम्मद इम्रान याने ११ धावांत दोन गडी बाद केले. साई चौधरी याने ९ धावांत दोन बळी घेतले. या सामन्यात व्यंकटेश सोनवलकर याने सामनावीर पुरस्कार संपादन केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *