
बुद्धिबळ स्पर्धेत डोंगरे, कौल, चक्रवर्ती, कोण्णूर, बर्वे यांना अजिंक्यपद
पुणे ः क्रीडा भारती पुणे महानगरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर हेडगेवार चषक दहाव्या खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात सौरभ म्हामणे याने साडेसहा गुणांसह विजेतेपद मिळविले. स्पर्धेतील अन्य गटात
चंद्रकांत डोंगरे, निहिरा कौल,सोमांगशु चक्रवर्ती, भुवन कोण्णूर, शुभंकर बर्वे हे विजेतेपदाचे मानकरी ठरले.
ही स्पर्धा पुणे जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशोकराव पलांडे यांच्या हस्ते झाला. यावेळी अखिल भारतीय महामंत्री क्रीडा भारतीचे राज चौधरी, पश्चिम महाराष्ट्र क्रीडा भारतीचे अध्यक्ष विजय पुरंदरे, हरिष अनगोळकर, विजय रजपूत, अनुजा दाभाडे, साई यन्नम उपस्थित होते.
खुल्या गटात अविरत चौहान,अर्णव नानल, वीरेश शरणार्थी व श्लोक शरणार्थी यांनी अनुक्रमे दोन ते पाच क्रमांक पटकाविले. स्पर्धेतील प्रौढ खेळाडूंच्या गटात चंद्रकांत डोंगरे, लक्ष्मण खुडे व गोवर्धन वसावे यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले तर महिला गटात निहिरा कौल, महक कटारिया व ईश्वरी गोसावी यांनी अनुक्रमे पहिली तीन पारितोषिके जिंकली.
स्पर्धेतील बिगर मानांकित खेळाडूंच्या गटात सोमांगशु चक्रवर्ती यांनी प्रथम क्रमांक मिळविला. विक्रम सिंग, सचिन जिते, उदयसिंह पाटील व खुशालचंद होले हे अनुक्रमे दोन ते पाच क्रमांकाचे मानकरी ठरले. स्पर्धेतील १४ वर्षाखालील गटात भुवन कोण्णूर, अभिजय वाळवेकर, विहान देशमुख, ऋषिकेश साळी, आदित्य तेलंगी यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकाविले.
दहा वर्षाखालील गटात शुभंकर बर्वे, अर्जुन कौलगुड, रिद्धेश वाघमारे, प्रियांशु यादव व अयांश देवडा यांना अनुक्रमे पहिली पाच पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेसाठी २५ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. स्पर्धेत तीनशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते त्यामध्ये दगडू गायकवाड (अमेरिका), सियून किम, जुनोह किम (दक्षिण कोरिया) या परदेशी खेळाडूंचाही सहभाग होता.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकाश कुंटे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय रजपूत यांनी केले.यावेळी प्राध्यापक शैलेश आपटे, शकुंतला खटावकर, जयंत गोखले, विजय रजपूत, राजेंद्र शिदोरे , दीपक मेहेंदळे, सुरेश दरवडे, आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच दीप्ती शिदोरे यांनी काम पाहिले.