
कमलेश पिसाळ, राजू काणे यांची माहिती
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आगामी क्रिकेट हंगामात अंडर १४ क्रिकेटपटूंना बोन टेस्ट देण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी वयाचा अधिकृत दाखला देण्यासाठी खेळाडूंना काही वैध कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव कमलेश पिसाळ व स्पर्धा समिता चेअरमन राजू काणे यांनी एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे लवकरच अंडर १४ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट संघटना अंडर १४ खेळाडूंसाठी कोणतीही बोन टेस्ट घेणार नाही. त्याऐवजी खेळाडूंना वयाचा अधिकृत दाखला देण्यासाठी काही कागदपत्रे सादरी करावी लागणार आहेत. त्यात प्रामुख्याने २०२५ या वर्षाचे स्कूल बोनाफाईड डिजिटल बर्थ सर्टिफिकेट, यूडीआयएसई नंबर, आधार कार्ड, पासपोर्ट (असल्यास), १०० रुपये अथवा ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अफिडेव्हिट करुन द्यावे लागणार आहे. या कागदपत्रांची सत्यता महाराष्ट्र क्रिकेट संघटना तपासणार आहे. यात चुकीची माहिती दिली तर संबंधित खेळाडूंवर कारवाई केली जाऊ शकते असे सचिव कमलेश पिसाळ व स्पर्धा समितीचे चेअरमन राजू काणे यांनी सांगितले आहे.