
मुंबई ः बँक ऑफ बडोदा-बीओबी मुंबई विभागीय निवड चाचणी कॅरम स्पर्धेमध्ये पुरुष गटात आजर अन्सारी तर महिला गटात इंदिरा राणे विजेते ठरले.
बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागातर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत मोक्याच्या क्षणी अचूक फटके साधत अन्सारीने गतविजेत्या विकास महाडिकला अंतिम फेरीत ५-१ असे नमविले. बँक ऑफ बडोदा-मुंबई क्रीडा विभागाचे प्रदीप सुरोशे व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण यांनी विजेते-उपविजेत्यांचे अभिनंदन केले.
उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम मानांकित विकास महाडिक याने जितेंद्र मिठबावकरचा तर आजर अन्सारीने हेमंत शेलारचा पराभव केला. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इंदिरा राणेने ज्योती श्रीमळला १७-८ असे हरवून अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.
अखिल भारतीय स्तरावर सुरत येथे होणाऱ्या बँक ऑफ बडोदा आंतर विभाग कॅरम स्पर्धेसाठी मुंबई विभागाच्या पुरुष संघाचे आजर अन्सारी, विकास महाडिक, हेमंत शेलार, जितेंद्र मिठबावकर आणि महिला संघाचे इंदिरा राणे, ज्योती श्रीमळ, सिध्दी तोडणकर, देवी शांती आदी खेळाडू प्रतिनिधित्व करणार आहेत.