
बीड ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा तलवारबाजी व धनुविंद्या असोसिएशन बीड यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी व धनुर्विद्या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोमवारी अंबाजोगाई येथील तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न झाला.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी स्पर्धेचे उद्घाटक अंबाजोगाईचे ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा, बीड तालुका क्रीडा अधिकारी रेवननाथ शेलार, अंबाजोगाईचे नगरसेवक संजय भुमरे, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सहसचिव डॉ पांडुरंग रणमाळ, लोखंडी गावचे सरपंच मनोज देशमुख, बीड जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव पिराजी कुसळे, प्रमोद महाजन स्कूल अंबाजोगाईचे प्राचार्य गीतांजली कुलकर्णी, मुकेश बिराजदार, तत्तापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नंदकिशोर मुंदडा म्हणाले की, खेळाडूंनी खेळाप्रती समर्पित असावे व आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहचण्याची जिद्द ठेवावी. खेळ खेळत असताना शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता शिक्षणामध्ये देखील प्राविण्य प्राप्त करुन आपल्या बुद्धिमतेची चुणूक दाखवावी. खेळताना खेळाडू वृत्तीने खेळावे. तसेच त्यांनी खेळताना क्रीडा मार्गदर्शकांचे अनमोल असे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन केले.
या स्पर्धेमध्ये एकूण ८८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत पंच म्हणून एनआयएस कोच आकाश बनसोडे, सुरज कदम यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी जाधव, नितेश शिराळे यांनी केले. प्रास्ताविक रेवननाथ शेलार यांनी केले. सचिव पिराजी कुसळे यांनी आभार मानले.