कुस्तीच्या आखाड्यासह क्रिकेट स्टेडियम उभारणार

  • By admin
  • August 26, 2025
  • 0
  • 197 Views
Spread the love
  • कुलगुरू डॉ विजय फुलारी यांचे प्रतिपादन

 – विद्यापीठ वार्षिक क्रीडा नियोजन समितीची बैठक

छत्रपती संभाजीनगर ः आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅकचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता आधुनिक कुस्ती आखाडा, बास्केटबॉल खेळाचे नवीन मैदान, स्वतंत्र क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी दिली. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा क्रीडा विभागाच्यावतीने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील क्रीडा नियोजन समितीची बैठक, उद्बोधन वर्ग व गुणवंत खेळाडुंचा सत्कार समारंभ मंगळवारी (२६ ऑगस्ट) आयोजित करण्यात आला होता. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या नाट्यगृहात सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू झाली. यावेळी जागतिक ख्याती प्राप्त वेटलिफ्टर आणि प्रशिक्षक अनन्या पाटील, प्र-कुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, क्रीडा संचालक डॉ सचिन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांचे क्रीडा संचालक उपस्थित होते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ व पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक व निवृत्त क्रीडा संचालकांचा गौरव यावेळी करण्यात आला. 

नावलौकिक उंचवावा 
या प्रसंगी कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी खेळाडूंशी संवाद साधला. सर्व प्रकारच्या सोयी सुविधा खेळाडूंना मिळवून देऊ, मात्र राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावून विद्यापीठाचा नावलौकिक उंचवा, असे आवाहनही त्यांनी केले. क्रीडा विभागाला निधीची कमतरता होऊ देणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली. लवकरच पन्नास लक्ष रक्कम खर्च करून कुस्तीची आखाडा, वनडोअर एन्ट्रीच्या माध्यमातून दोन बास्केटबॉल खेळाची मैदाने, क्रिकेट स्टेडियम नव्याने बांधून देणार, असे त्यांनी घोषित केले. 

दोषी निवड समिती सदस्यांवर कारवाई 
आजघडीला खेळात राजकारण अधिक होत असल्याचे जाणवू लागले असून त्यामुळे दर्जेदार व उत्कृष्ट खेळाडूंची संघात निवड होत नसल्याने अनेक खेळाडू खेळाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी विद्यापीठस्तरावर कायद्याच्या चौकटीत नियमावली तयार करण्यात येणार असून दोषी निवड समितीतील सदस्यांवर कठोर कारवाई करण्यास विद्यापीठ मागेपुढे पाहणार नाही असेही कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी ठणकावून सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अनन्या पाटील यांनी बाल वयापासून ते आजतागायत कशा कठोर मेहनतीने आपले जागतिक पातळीवरील अस्तित्व निर्माण केले त्याबद्दल अनुभवकथन केले व आताच्या खेळाडूंनी देखील मैदानावर कठोर मेहनतीने व एकाग्रतेने सरावाचे अध्ययन केल्यास हमखास यश प्राप्त होऊ शकते, असे सांगितले. 

तत्पूर्वी, क्रीडा संचालक डॉ सचिन देशमुख यांनी प्रास्तविकात क्रीडा विभाग राबवत असलेल्या नवनवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यात क्रीडा विभागासाठी स्वतंत्र बँकेत खाते उघडल्याने खेळाडूंनी तात्काळ त्यांचा प्रवास व भोजन भत्ता प्राप्त होण्यास मदत होणार आहे आणि कुलगुरू यांच्या परवानगीने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल व बॅडमिंटन पुरुष गटांच्या स्पर्धेच्या आयोजनाचा प्रस्ताव अखिल भारतीय विद्यापीठ महासंघाकडे पाठवला असल्याचे सांगितले. 

कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते मागील शैक्षणिक वर्षातील सेवानिवृत्त क्रीडा प्राध्यापक, क्रीडा संचालक डॉ मीनाक्षी मुलीया, डॉ किशोर मचाले, डॉ बी डी काळे, डॉ हानिफ शेख, डॉ अत्ताउल्लाह जहागीरदार, डॉ सुनील पांढरे यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ वसंत झेंडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ अभिजीतसिंग दिखत यांनी केले. डॉ मसूद हाश्मी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रशिक्षक डॉ मसूद हाश्मी, डॉ सुरेंद्र मोदी, डॉ अभिजित दिखत, किरण शूरकांबळे , गणेश कड, डॉ रामेश्वर विधाते, मोहन वाहिलवार, रमेश सलामपूरे, विलास भालेराव, अशोक जिरे, अशोक गांगुले, जी एम श्रेष्ठी, पुनमचंद जावळे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *