
आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर, विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ अय्याज शेख यांची माहिती
पुणे ः पुणे शहर विभागातील सर्व महाविद्यालयांमध्ये आंतर-महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर झाले असून यात तब्बल आठ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत अशी माहिती पुणे विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ अय्याज शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे शहर विभागीय क्रीडा समितीची वर्ष २०२५-२६ साठीची पत्रकार परिषद पुना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कॅम्प, पुणे येथे पार पडली. या परिषदेत पुणे शहर विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ अय्याज शेख यांनी आगामी वर्षातील उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुणे शहर विभागातील सर्व महाविद्यालयांमध्ये आंतर-महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये ८ हजारांहून अधिक विद्यार्थी खेळाडू सहभागी होणार आहेत. एकूण ४३ खेळांच्या स्पर्धा महिला आणि पुरुष अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धांचे आयोजन पुणे शहरातील ३० हून अधिक महाविद्यालयांतून करण्यात येईल. तसेच या स्पर्धांदरम्यान फिजिओथेरपी आणि स्पर्धांचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
अध्यक्ष पुणे शहरी विभागीयक्रीडा समिती व पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ इक्बाल शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकारांचे मनःपूर्वक स्वागत केले. या परिषदेत त्यांनी महाविद्यालयातील खेळाडूंसमोर उभे राहणारे विविध प्रश्न, त्यांचे निराकरण करण्यासाठी होणारे प्रयत्न आणि भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत सविस्तर चर्चा केली.
त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा मंडळाचे प्रभारी संचालक डॉ सुदाम शेळके यांनी विद्यापीठातील चार विभाग, स्पर्धांचे प्रकार आणि आयोजनाचे स्वरूप याबाबत माहिती दिली. पुणे शहर विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष आणि पुना कॉलेजचे प्राचार्य डॉ इक्बाल शेख यांनी उपस्थित पत्रकार व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.