
बालेवाडी संकुलात क्रीडादिनी मिशन लक्ष्यवेध योजनेचा शुक्रवारी होणार शुभारंभ
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांसह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ३२० पदकविजेत्यांना रोख पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. यावेळी मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभही केला जाणार आहे.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग सभागृहात शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रीय क्रीडा दिन समारंभ होईल. या प्रसंगी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे जिल्हातील खासदार, आमदार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
उत्तराखंड येथे फेबुवारीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने गौरवशाली कामगिरी केली होती. ५५ सुवर्ण, ७० रौप्य व ७६ कांस्य अशी एकूण २०१ पदके पटकावून, सहभागी राज्यांमध्ये प्रथम क्रमांक संपादन केला. या स्पर्धेतील ३१४ पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव केला जाणार आहे. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना अनुकमे ७ लाख, ५ लाख आणि ३ लाख रोख बक्षिस दिले जाणार आहे. मार्गदर्शकांना अनुक्रमे ५० हजार, ३० हजार व २० हजारांचे पारितोषिक दिले जाणार आहेत.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांमध्ये ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे, आशियाई पदक विजेती राही सरनोबत, आदिती स्वामी, ऑलिम्पिकपटू देवेंद्र वाल्मिकी, विश्व करंडक विजेती प्रियंका इंगळे या दिगज्ज क्रीडापटूंचा समावेश आहे. सर्वाधिक ८ पदकांचा विक्रम करणाऱ्या आदिती हेगडे हिला ३२ लाखांचे बक्षिस प्राप्त होणार आहे. राज्याच्या क्रीडा धोरण-२०१२ नुसार,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शकांना २८.७० कोटी रकमेची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. आंतराराष्ट्रीय स्पर्धेत पदकाची लयलूट करणाऱ्या ६ पदकविजेत्यांचाही गौरव केला जाणार आहे
मिशन लक्ष्यवेध
कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या मिशन लक्ष्यवेध या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ व बोधचिन्ह अनावरण केले जाईल. वार्षिक १६० कोटी इतका खर्च मंजूर करण्यात आलेला या योजनेत १२ क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आलेली असून या सर्व क्रीडा प्रकारातून राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, पहिल्या टप्प्यातील सहा क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षण योजनेचा शुभांरभ शुक्रवारी होईल. यामध्ये ॲथलेटिक्स, हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, रोईंग व लॉन टेनिस खेळाचा समावेश असल्याची माहिती सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली आहे.
कार्यक्रमासाठी सुमारे ३०० खेळाडू, १०० मार्गदर्शक आणि १०० पदाधिकारी, क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षणार्थी असे एकूण ८०० जण उपस्थित राहणार आहेत.