
- मयूर ठाकरे, क्रीडा शिक्षक, नंदुरबार.
नंदुरबार जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आपले अनोखे स्थान निर्माण करणारे पंकज पाठक सर यांची सेवानिवृत्ती ही केवळ एक औपचारिकता असली, तरीही त्यांच्या कार्याचा ठसा हा कायमचा राहणार आहे. श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमध्ये कार्यरत असताना त्यांचे नाव आणि काम साता समुद्रापार पोहोचले, हे त्यांच्या समर्पणाचे जिवंत उदाहरण आहे.
“खेळाडू घडवणे हेच खरे काम” या तत्त्वावर काम करत त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणारे खेळाडू घडवले. राकेश कोकणी, भूषण चित्ते, हेमंत बारी, मयूर ठाकरे, राजेंद्र भोई यांसारख्या अॅथलेटिक्स प्रकारातील हातोडा फेक, थाळी फेक यासारख्या खेळात पारंगत खेळाडू हे त्यांच्याच मार्गदर्शनाची फलश्रुती आहेत.

पाठक सरांनी जिल्हा क्रीडा कार्यालय, एकविध खेळ संघटना तसेच युवा क्रीडा कार्यकर्ते यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवत नंदुरबार जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला एक नवे दिशा व वैभव प्राप्त करून दिले. पंच, प्रशिक्षक, आणि खेळाडू यांच्यामधील समतोल राखून न्यायाची भूमिका बजावत त्यांनी क्रीडाक्षेत्रात आदर्श निर्माण केला.
प्राचार्य पदावर असतानाही क्रीडाविषयक अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी सतत मार्गदर्शन दिले. जिल्ह्यात झालेल्या विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे संयोजन आणि शासनामार्फत आयोजित कार्यक्रमांचे यशस्वी संचालन हे त्यांच्या नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण आहे.
महाराष्ट्र शासनाचा गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार, तसेच इतर विविध संस्थांचे सन्मान हे त्यांच्या कार्याची पावती आहेत. त्यांनी स्थापन केलेली ‘वात्सल्य सेवा समिती’ ही संस्था आज कला, क्रीडा आणि संस्कृतीच्या क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी सुरू केलेली चळवळ आजही नव्या पिढीला प्रेरणा देत आहे.
जिल्ह्यातील ‘खेळ संस्कृती’ आणि ‘क्रीडा क्लब’ स्थापनेमागे त्यांचे द्रष्टे नेतृत्व होते. त्यांच्या मार्गदर्शनाने तयार झालेली क्रीडा पिढी आज विविध ठिकाणी यशाचे झेंडे फडकवते आहे.
पंकज पाठक सर यांचे योगदान हे अमूल्य असून त्यांचा पुढील जीवनप्रवास क्रीडा क्षेत्रासाठीच नव्हे तर समाजासाठीही निश्चितच मार्गदर्शक ठरेल, याबाबत शंका नाही. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा