
पुणे ः पिंपरी चिंचवड ही कष्टकरी तसेच उद्योजकांची नगरी आता खेळाडूंची नगरी म्हणून उदयास येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी मधील प्रयोद देविदास रजपूत याने जळगाव येथील राज्य स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बेस्ट बॉक्सरचा पुरस्कार संपादन केला.
या स्पर्धेत युथ गटामध्ये ४७ ते ५० किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावत प्रयोद रजपूत यानेै स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत त्याला उत्कृष्ट बॉक्सर पारितोषिक प्रदान करण्यात आले. प्रयोद रजपूत हा लक्ष्मण जगताप कला व क्रीडा अकॅडमीचा विद्यार्थी असून कोच डॉ राहुल पाटील व संदीप धंदर तसेच पिंपरी चिंचवड बॉक्सिंग असोसिएशनचे सेक्रेटरी विजय यादव, महागुरू गोपाल देवांग यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे.
प्रयोद रजपूत हा सर्वसामान्य वर्गातील खेळाडू आहे आणि वय वर्षे नऊपासून बॉक्सिंग खेळत आहे. प्रयोद सध्या एनडीए एलडब्ल्यूएस अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत असून राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन विजेता होणे हे त्याचे लहानपणापासून लक्ष्य होते आणि गुरुजनाच्या मार्गदर्शनाने त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करता आले. या सुवर्ण कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.