
मुंबई ः श्रीकांत स्पोर्ट्स क्लब व सार्वजनिक गणेशोत्सव-कांदिवलीतर्फे लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत श्रीकांत चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ६४ खेळाडूंमध्ये शनिवारी (३० ऑगस्ट) चुरस होईल.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेत मुंबई शहर व उपनगरसह ठाणे पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होत असल्यामुळे सामने दर्जेदार होतील. गत कॅरम हंगाम गाजवणारा प्रसन्ना गोळे आणि अर्णव गावंड यांच्यात उदघाटनीय सामना माजी केंद्रीय राज्य अर्थमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. शालेय कॅरम खेळाडूंची प्रमुख स्पर्धेत उत्तम कामगिरी होण्यासाठी पालकांच्या विशेष मागणीनुसार स्पर्धात्मक खेळासह मोफत मार्गदर्शन देखील दिले जाणार आहे. चॅम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा बाद पद्धतीने होईल.
महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेची राष्ट्रीय सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवी, कळसुलकर इंग्लिश स्कूल – सावंतवाडीचा भारत सावंत, इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, पोद्दार अकॅडमी-मालाडचे प्रसन्न व पुष्कर गोळे, आयईएस सुळे गुरुजी शाळेची ग्रीष्मा धामणकर, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमेर पठाण, चेंबूर हायस्कूलचा मयुरेश पवार, डॉ अँटोनियो दासिल्वा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव व ओमकार देसाई , शारदाश्रम विद्यामंदिर-दादरचा आरव अंजर्लेकर, ओमकार इंटरनॅशनलची प्रेक्षा जैन, कनोसिया हायस्कूलची वेदिका पोमेंडकर, मायकल हायस्कूलचा निखिल भोसले, जनरल एज्युकेशन अकॅडमीचा वेदांत लोखंडे, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे नील म्हात्रे, सारा देवन व निधी सावंत आदी सब ज्युनियर कॅरमपटूंमध्ये निकराच्या लढती रंगतील.
अशोकनगर, कांदिवली-पूर्व येथील श्रीकांत स्पोर्ट्स क्लबच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिवर्षी युवा खेळाडू व कलाकारांना प्रोत्साहन देतांना विविध समाजोपयोगी उपक्रमांपैकी मोफत शालेय कॅरम स्पर्धा गतवर्षापासून अधिक लोकप्रिय ठरत आहे. म्हणूनच संस्थेतर्फे लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया यांनी उपक्रम प्रायोजित केल्यामुळे पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषक, स्ट्रायकर पुरस्कार दिले जाणार असून अंतिम विजेत्यास रोख रुपये दोन हजार, उपविजेत्यास रुपये एक हजार बक्षीस देण्यात येईल.