
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धांजली वाहिली आणि भारताला क्रीडा क्षेत्रातील जागतिक उत्कृष्टतेचे केंद्र बनवण्यासाठी त्यांचे सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
हॉकी इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू मानले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. १९२८, १९३२ आणि १९३६ च्या ऑलिंपिकमध्ये ध्यानचंद यांनी भारतासाठी सलग सुवर्णपदके जिंकली होती.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले, ‘राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा. या खास दिवशी, पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या मेजर ध्यानचंद जी यांना आदरांजली.’ पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला की त्यांचे सरकार देशातील क्रीडा आणि तंदुरुस्तीची संस्कृती वाढवण्यासाठी, खेळाडूंना संस्थात्मक पाठिंबा मजबूत करण्यासाठी आणि आधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि स्टेडियम प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘गेल्या दशकात भारताचे क्रीडा परिदृश्य खूप बदलले आहे. तरुण प्रतिभा शोधण्यासाठी तळागाळातील कार्यक्रमांपासून ते जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत, आम्हाला क्रीडा क्षेत्रासाठी एक अत्याधुनिक परिसंस्था निर्माण करायची आहे. आमचे सरकार खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि भारताला क्रीडा क्षेत्रातील जागतिक उत्कृष्टतेचे केंद्र बनवण्यासाठी वचनबद्ध आहे.’
क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक भारताला क्रीडा महासत्ता बनवेल अशी आशा व्यक्त केली. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममधील एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते म्हणाले, ‘क्रीडा प्रशासन विधेयक मंजूर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारताला क्रीडा क्षेत्रातील अव्वल देशांपैकी एक बनवण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले आहे.’
मांडविया म्हणाले, ‘भारताला शतकानुशतके खेळांची परंपरा आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आज क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त मी देशवासियांना राष्ट्रीय क्रीडा दिनाचे अभिनंदन करतो.’