
नाशिक ः वेटलिफ्टिंग प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हिची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षण शिबिरासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी कालावधीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी भारत सरकारने देशभरातून काही प्रशिक्षकांची निवड केली आहे. त्यात तृप्ती पाराशरचा समावेश आहे. तृप्ती पाराशरची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रामधून तृप्ती पाराशर ही पहिलीच प्रशिक्षक ठरली आहे. संपूर्ण भारतातून अशा मोजक्याच प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
तृप्ती पाराशरने आतापर्यंत नऊ आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले आहे व आता सध्या ती एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिंपिक गेम्स मध्ये काम करण्यासाठी तयारी करत आहे. तृप्ती पाराशरला ऑलिंपिक कोच व तसेच द्रोणाचार्य पुरस्कार्थी विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. या नियुक्तीबद्दल तृप्ती पाराशरचे सर्वत्र कौतुक होत आहे.