
रावेर ः रावेर येथील व्ही एस नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर उपस्थित खेळाडूंना मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले. खेळाचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच खेळाडूंनी विद्यापीठासाठी जास्तीत जास्त पदक प्राप्त करावेत हा संकल्प मेजर ध्यानचंद यांच्या प्रेरणेने घ्यायला हवा असे प्रतिपादन केले.
यावेळी उपप्राचार्य प्रा एस यु पाटील हे उपस्थित होते. क्रीडा संचालक डॉ उमेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांमध्ये खेळ प्रवृत्ती जीवंत असणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. या प्रसंगी महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कॅरम, बुद्धिबळ, तायक्वांदो, रग्बी अशा खेळांचा समावेश होता.
कॅरम स्पर्धेत रूतीका इंगळे व प्रीती ठाकणे या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक मानसी पाटील व हर्षा पवार यांनी संपादन केला. पुरुष गटात संदीप महाजन व सुजीत मोरे यांनी प्रथम तर अनिकेत परदेशी हे उपविजेते ठरले.
सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे व खेळाडूंचे यावेळी महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ उमेश पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा एस यु पाटील यांनी केले.