
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः बिलाल पटेल सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात लकी क्रिकेट क्लब संघाने महाराणा ११ संघाचा चुरशीच्या लढतीत अवघ्या १४ धावांनी पराभव केला. या सामन्यामध्ये बिलाल पटेल याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. या सामन्यात लकी क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि २० षटकात दमदार फलंदाजी करत सात बाद १७२ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना महाराणा ११ संघाने शानदार फलंदाजी केली आणि २० षटकात नऊ बाद १५८ धावा काढल्या. महाराणा ११ संघाला अवघ्या १४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यात लहू याने ५० चेंडूत ६६ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याने पाच चौकार व तीन षटकार मारले. शाहरुख पठाण याने ५५ चेंडूंत ६६ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याने चार उत्तुंग षटकार ठोकले. परवेझ खान याने २७ चेंडूंत ३७ धावा फटकावल्या. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत बिलाल पटेल याने २५ धावांत चार विकेट घेऊन सामनावीर पुरस्कार संपादन केला. सुनील जी याने २७ धावांत तीन गडी बाद केले. मदनसिंग घुनावत याने ३० धावांत दोन बळी घेतले.
दुसरा सामना सुरू असताना पावसाचे आगमन झाले. त्यामुळे सामना रोखण्यात आला. त्यावेळी इम्रान पटेल २२ नाबाद संघाने २० षटकात पाच बाद २१८ धावा काढल्या होत्या तर एमई क्रिकेट अकॅडमी संघाने ७.४ षटकांच्या खेळात तीन बाद ५२ धावा काढल्या होत्या