
अजितकुमार संगवे, आनंद चव्हाण, संतोष खेंडे, श्रीकांत शेटे, शरणबसवेश्वर वांगी यांना अहिल्याबाई क्रीडा पुरस्काराचे वितरण
सोलापूर ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर मल्टीपर्पज हॉलची निर्मिती झाली असून लवकरच त्याचा वापर सुरू होईल. आज सोलापूरचे खेळाडू विविध स्पर्धेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळवत आहेत. आता यापुढे अधिक पारितोषिके मिळवण्यासाठी तसेच सोलापूरचे नाव उज्वल करण्यासाठी खेळाडूंसाठी जागतिक दर्जाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या हस्ते अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांचे थाटात वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आणि क्रीडा विभागाचे संचालक डॉ अतुल लकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी त्यांनी क्रीडा विभागाच्या यशाचा आढावा घेतला.
त्याचबरोबर यावेळी संगमेश्वर कॉलेजला उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालयाचा प्रा पुरणचंद्र पुंजाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ ऋतुराज बुवा व त्यांच्या सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी विद्यापीठाच्यावतीने उत्कृष्ट शारीरिक शिक्षण अध्यापक व संचालकाचा पुरस्कार संगमेश्वर कॉलेजमधील डॉ आनंद बाळासाहेब चव्हाण, उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार संगमेश्वर जुनिअर कॉलेजचे संतोष धर्मा खेंडे यांना, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार स्विमिंग अँड डायव्हिंगमधील श्रीकांत गंगाधर शेटे यांना हँडबॉलमधील शरणबसवेश्वर सिद्धाराम वांगी यांना तर अहिल्यादेवी उत्कृष्ट क्रीडा पत्रकारितेचा पुरस्कार दैनिक तरुण भारतचे वृत्तसंपादक अजितकुमार बापूराव संगवे यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच यावेळी ऑल इंडिया, साऊथ वेस्ट झोन आणि क्रीडा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा रोख रक्कम व पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. क्रीडा शिक्षक व मार्गदर्शकांचा देखील यावेळी गौरव झाला. याचबरोबर यावेळी परीक्षा विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी शिवछत्रपती व अर्जुन पुरस्कार विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा देवानंद चिलवंत, महेश गादेकर, विद्यापीठाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू व क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ तेजस्विनी कांबळे व प्रा श्रुती देवळे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे यांनी आभार मानले.