
पुणे ः ‘खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया’ असे प्रतिपादन केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेनेच्या संकुलात आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमात केले.
क्रीडा दिनानिमित्ताने मुरलीधर मोहोळ यांनी या संकुलात सुरू असलेल्या सुशांत चिपलकट्टी आंतरराष्ट्रीय १९ वर्षांखालील गटातील बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी सुसंवाद साधला.
मोहोळ यांनी पुढे सांगितले की, खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळेच प्रत्येकाने मैदानावर जाऊन कोणता ना कोणता तरी खेळ खेळावा. खेळामुळेच एकाग्रता वाढते. आपले आरोग्य निरोगी होते. बॅडमिंटन हा तर एकाग्रता वाढवण्यासाठी आणि शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी उत्तम खेळ आहे. मुलांनी हातात मोबाईल द्वारे गेमिंग न करता मैदानावर जाऊन मोकळ्या हवेत वेगवेगळे खेळ खेळावेत म्हणजे त्यांचेही जीवन समृद्ध होईल. खेळामुळे आपले मन ताजेतवाने होतेच पण त्याचबरोबर आपली शारीरिक तंदुरुस्ती ही वाढते.
राष्ट्रीय विजेती बॅडमिंटनपटू पुण्याच्या शरयू रांजणे हिच्या बरोबर बॅडमिंटन खेळण्याचा आनंदही मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी घेतला. कार्यक्रमात सुरुवातीला मोहोळ यांनी भारतमाता आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले. यावेळी पीडीएमबीएतर्फे मोहोळ ह्यांना त्यांच्या नावाचा बॅडमिंटनचा टी-शर्ट भेट दिला जो त्यांनी उत्साहाने परिधान केला.
या समारंभाला पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे, सरचिटणीस सीए रणजीत नातू, उपाध्यक्ष सुशील जाधव, खजिनदार सारंग लागू आणि स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग, सुधांशू मेडसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.