
मुंबई ः श्रीकांत स्पोर्ट्स क्लब व सार्वजनिक गणेशोत्सव-कांदिवलीतर्फे लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत श्रीकांत चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत आरव सावंत, प्रेक्षा जैन, वेदांत राणे, ध्रुव शहा, प्रसाद माने यांनी विजय मिळवले.
अशोकनगर, कांदिवली-पूर्व येथे शनिवारी क्रीडाप्रेमी समीर चव्हाण आणि सेक्रेटरी संदीप आयरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. चॅम्पियन कॅरम बोर्डवर बाद पद्धतीने सुरू झालेल्या स्पर्धेत आरव सावंतने खेळामध्ये कमालीचे सातत्य राखताना स्वरूप बेलणकरचा १६-४ असा पराभव केला. प्रेक्षा जैनने धृती रायला ६-२ असे हरवले. वेदांत राणेने एकतर्फी लढतीत निधी सावंत हिच्यावर १५-२ अशी मात केली. ध्रुव शहाने रुद्र चव्हाणला ११-७ असे चकवले तर प्रसादने ग्रीष्मा धामणस्करला अशा एकतर्फी सामन्यात १९-० अशा फरकाने पराभूत केले. प्रसादने अप्रतिम खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूला गुण मिळविण्याची संधी दिली नाही.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने सुरू झालेल्या स्पर्धेत मुंबई शहर व उपनगरसह ठाणे पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले. श्रीकांत स्पोर्ट्स क्लबच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिवर्षी युवा खेळाडू व कलाकारांना प्रोत्साहन देतांना विविध समाजोपयोगी उपक्रमांपैकी मोफत शालेय कॅरम स्पर्धा गतवर्षापासून अधिक लोकप्रिय ठरत आहे.