
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः मयूर वैष्णव, अबुहुरिया अन्सारी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इथिकल क्रिकेट अकादमी संघाने एमई क्रिकेट अकादमी संघावर ८० धावांनी दणदणीत विजय नोंदवला. दुसऱया सामन्यात एमके डेव्हलपर्स संघाने झैनब सहारा संघावर ४७ धावांनी विजय मिळवला. या लढतींमध्ये मयूर वैष्णव आणि अबुहुरिया अन्सारी यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.
रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. इथिकल क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात आठ बाद १५० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एमई क्रिकेट अकादमी संघ १३.३ षटकात अवघ्या ७० धावांत सर्वबाद झाला. त्यामुळे इथिकल अकादमीने तब्बल ८० धावांनी मोठा विजय साकारला. १० धावांत ७ बळी टिपणारा मयूर वैष्णव याने सामनावीर पुरस्कार पटकावला.

या सामन्यात साहिल तडवी (४२), पार्थ फोके (३९) व संकेत पगारे (३६) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत मयूर वैष्णव याने प्रभावी गोलंदाजी केली. मयूरने अवघ्या १० धावांत सात विकेट घेऊन संघाला मोठा विजय मिळवून दिला. या स्पर्धेतील मयूरचा हा सर्वात भेदक स्पेल ठरला आहे. प्रज्वल अंधारे याने ३४ धावांत तीन विकेट घेतल्या. विनोद यादव याने ९ धावांत दोन बळी घेतले.

एम के डेव्हलपर्स संघाची आगेकूच
दुसरा सामना एमके डेव्हलपर्स आणि झैनब सहारा यांच्यात झाला. यात एमके डेव्हलपर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात सात बाद १९१ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना झैनब सहारा संघाने २० षटकात पाच बाद १४४ धावा काढल्या. त्यांना ४७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यात अबुहुरिया अन्सारी याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
या सामन्यात हर्ष किर्तीकर याने ५३ चेंडूत ८४ धावा फटकावत सामना गाजवला. त्याने पाच षटकार व सात चौकार मारले. अबुहुरिया असारी याने तीन षटकार व आठ चौकारांसह ५७ धावांचे योगदान दिले. लक्ष बाबर याने ४२ धावा फटकावल्या. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत साजिद सय्यद (३-२२), हर्ष किर्तीकर (२-२८) व वसीम मस्तान (२-२५) यांनी विकेट घेतल्या.