
छत्रपती संभाजीनगर शहरात ५५० खेळाडूंचा जिल्हा ऑलिम्पिक, क्रीडा-भारती संघटनेकडून गौरव
छत्रपती संभाजीनगर ः भारत ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद मागत आहेच. मात्र आता राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद मिळवण्यासाठी दावेदारी करण्यास आपल्या मंत्रीमंडळाने हिरवा कंदील दिला आहे. खेळाडूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी आता क्रीडा विज्ञानाची जोड दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शुक्रवारी येथे दिली.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा ऑलिम्पिक संघटना आणि क्रीडा भारतीच्या वतीने ५५० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि शिवछत्रपती पुरस्कारार्थी खेळाडूंचा सत्कार तापडिया नाट्य मंदिरात थाटामाटात पार पडला. या सत्कार प्रसंगी रक्षा खडसे या मार्गदर्शनपर बोलत होत्या. यावेळी अर्जुन पुरस्कारार्थी ऑलिम्पियन कविता राऊत, राज्यसभा खासदार डॉ भागवत कराड यांनीही खेळाडूंचा गौरव केला. प्रास्ताविकात क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी खेळाडूंच्या सत्काराची परंपरा अविरतपणे चालवत राहणार असल्याचे सांगितले.
क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, खेळ आपल्याला प्रेरणा, दिशा देतो, खेळाने आरोग्य, मानसिकता चांगली राहते. तुमचे आई वडिलांचा त्याग आणि गुरूंनी दिलेले प्रशिक्षण महत्वाचे आहे. पहिले आई वडील डॉक्टर इंजिनीयर व्हावे असे म्हणत होते आता खेळाडू व्हावा असे वाटते. आपल्यातील एखादा सचिन, पीव्ही सिंधू, नीरज चोप्रा, कविता राऊत घडवायचे आहेत.

देशाने २०३६ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताने यजमानपदासाठी दावा केला आहेच. पण आता राष्ट्रकुल स्पर्धा आपल्या देशात खेळवण्यासाठीही दावा करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. आता आपल्याला देशात दोन आंतराष्ट्रीय स्पर्धा होतील ज्यातून नवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आता यंदाच्या वर्षात प्रत्येक खासदाराला तीन दिवस खासदार चषक क्रीडा स्पर्धा खेळवण्याची आदेश देण्यात आले आहेत. खेळाडूंचे पदक अनेकदा थोड्या गुणांनी जाते. मात्र असे होऊ नये म्हणून खेळडूंच्या मेहनतीला क्रीडा विज्ञानाची जोड देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी या कार्यक्रमात केली.
डॉ भागवत कराड यांनी आपल्या भाषणात मुलांना मैदानाकडे जाण्याचे आवाहन केले. खेळ फक्त यश नाही तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य प्रदान करते, असे प्रतिपादन डॉ. भागवत कराड यांनी यावेळी केले.
सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी क्रीडा भारती आणि छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष डॉ उदय डोंगरे, सचिव गोविंद शर्मा, सहसचिव डॉ दिनेश वंजारे, क्रीडा-भारतीचे विनायक राऊत, डॉ संदीप जगताप आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत बिऱ्हाडे यांनी केले.
खेळात यश मिळवण्यासाठी शिस्त अत्यंत महत्वाची : कविता राऊत
अर्जुन पुरस्कारार्थी आणि ऑलिम्पियन धावपटू कविता राऊत यांनीही यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन केले. कविता राऊत म्हणाल्या की, आपल्याला शिस्त असणे खूप गरजेचे आहे. दिवसभर आपण काय करतो हे पहावे, खेळात संयम आणि सातत्य ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाने ध्येय ठेवले पाहिजे आणि ते पूर्ण होईपर्यंत थांबू नका. आश्रम शाळेत शिकत असताना बाहेरगावी जायला मिळाले म्हणून खेळाकडे वळले. आज खेळाडूंच्या मागे अनेक संस्था आहेत, मी खेळत असताना फक्त माझे शिक्षक मागे होते. माझ्या लहानपणी पी टी उषा यांचा धडा अभ्यासाला आणि आज पाचवीच्या वर्गात माझा धडा आहे हे माझं भाग्य आहे.