
छत्रपती संभाजीनगर ः डॉ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयाच्या ‘शिखरकन्या ॲडव्हेंचर क्लब’ आणि शारीरिक शिक्षण विभागातर्फे ‘राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त’ सोनेरी महाल ते दौलताबाद किल्ला अशी एकूण १८ किलोमीटर एक दिवसीय गिरिभ्रमण मोहीम आयोजित करण्यात आली होती.
सोनेरी महाल येथून प्राचार्या डॉ सुनीता बाजपाई यांच्या हस्ते या मोहिमेचा ‘फ्लॅग ऑफ’ करण्यात आला. या प्रसंगी डॉ रमा दूधमांडे आणि डॉ शशिकांत सिंग उपस्थित होते. सोनेरी महालापासून गोगाबाबा टेकडीमार्गे देशभक्तीपर घोषणा देत शिखरावर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यात आला. ‘ हर पहाड तिरंगा ‘ या ब्रीदवाक्यासह मोहिमेची दमदार सुरुवात झाली. पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच कृतिशील असलेल्या ‘शिखरकन्या ॲडव्हेंचर क्लब’च्या वतीने गोगाबाबा टेकडी ते चिमणपीरवाडी या मार्गावर सीडबॉलचे रोपण करण्यात आले.
मुसळधार पाऊस, धुके, डोंगर, दाट झाडी आणि छोटे-मोठे धबधबे पार करत ही मोहीम सोनेरी महाल, गोगाबाबा टेकडी, चिमणपीरवाडी, अबदीमंडि आणि एच२ओ वॉटर पार्क या मार्गाने १८ किलोमीटरचे अंतर पार करून दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी संपली. या मोहिमेदरम्यान साहसी क्रीडा प्रकारातील ‘क्लायंबिंग’ (दोराच्या साहाय्याने वर चढणे) आणि ‘रॅपलिंग’ (दोराच्या साहाय्याने खाली उतरणे) या कौशल्यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
या मोहिमेत ११० मुली आणि ६३ मुले असे एकूण १७३ गिर्यारोहक सहभागी झाले होते. सर्वात कमी वयाचे ५ वर्षीय वैदेही प्रशांत गीते, ८ वर्षीय देवांश शेटे आणि समृद्धी आहेर तसेच ५६ वर्षीय प्रा. दिलीप जाधव यांनीही ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. ‘साहसी क्रीडा प्रकारात मुलींचा सहभाग वाढवणे’ हे ‘शिखरकन्या ॲडव्हेंचर क्लब’चे प्रमुख ध्येय या मोहिमेतून पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
या मोहिमेदरम्यान वाटेत जमा झालेला प्लास्टिकचा कचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. अशा प्रकारे, पर्यावरण संवर्धनाचा मोहिमेचा मुख्य हेतू साध्य झाला. या मोहिमेचे नेतृत्व एव्हरेस्टवीर डॉ मनीषा वाघमारे आणि शुभम शिंदे यांनी केले. प्रा सिद्धार्थ शिंदे, अश्विनी शहाणे, प्रा माधुरी मुत्याल, प्रा रितू ठाकूर, हर्षल पवार आणि रुद्रप्रसाद ढवळे यांनी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.